- तिकीट काढूनच एसटीतून प्रवास करा अन्यथा होईल भुर्दंड…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ ऑक्टोबर २०२२) :- एसटीमध्ये प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना तिकीट काढून प्रवास करणे सक्तीचे आहे; परंतु काही महाठग पैसे वाचविण्याच्या नादात तिकीट न काढता प्रवास करतात. अशा महाठगांकडून पुणे जिल्ह्यातील एसटी प्रशासनाकडून चार महिन्यांत एक लाख ५ हजार रुपये दंड वसूल केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून निर्बंध हटविण्यात आल्याने एसटीतून प्रवास करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. यामुळे गर्दी वाढली आहे. एसटीच्या उत्पन्नात भरही पडत आहे; परंतु या गर्दीच्या काळात फुकट प्रवास करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे अशा प्रवाशांकडून तिकीट चेकरकडून दंड वसूल करण्यात येत आहे.
गेल्या महिन्यात गणपती उत्सव असल्याने सर्व गाड्या भरून जात होत्या. या काळात एसटीत प्रवासी संख्या प्रमाणापेक्षा जास्त असल्याने काही महाठग तिकीट न काढता प्रवास करत असल्याचे दिसून आहे. अशा प्रवाशांकडून वेळीच दंडदेखील वसूल करण्यात आला आहे. एसटीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकीट काढणे बंधनकारक आहे. तरीही काही प्रवाशी विनातिकीट प्रवास करण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रवाशांकडून वेळोवेळी दंडदेखील वसूल करण्यात येत आहे . त्यासाठी विशेष पथकदेखील नेमले आहेत, तरीही फुकट प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी न होता ती वाढत आहे. त्यामुळे असे प्रवासी एसटी प्रशासनाला डोकेदुखी ठरत आहेत. एसटीच्या पथकाकडून करण्यात आलेल्या तपासणीत गेल्या चार महिन्यांत ८२ फुकटे प्रवासी सापडले आहे. त्यांच्याकडून एक लाख ५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.















