- पालिकेचा स्थापत्य विभाग झोपलाय?; दोन दिवसात रस्त्यांची डागडुजी करा..
- माजी नगरसेवक वसंत बोराटे यांचा पालिकेला इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ ऑक्टोबर २०२२) :- परतीच्या पावसाने शहरासह मोशी-बो-हाडेवाडीत जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे सुस्थितीतील रस्ते पावसाने वाहून नेली आहेत. रस्ते कुठे व खड्डे कुठे? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पालिकेने तातडीने हे रस्ते दुरुस्त करावेत, अशी मागणी माजी नगरसेवक वसंत बोराटे यांनी पालिकेच्या स्थापत्य विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
वसंत बोराटे म्हणाले, पावसामुळे मोशी-बो-हाडेवाडीतील बालाजी विश्व सोसायटी, डिव्हाईन सोसायटी, प्रिंस्टीन ग्रीन सिल्वर ९ रस्ता, स्वराज सोसायटी, मंत्रा सोसायटी, एस के गार्डन तसेच खिरीड वस्ती, गायकवाड वस्ती, साहिल ओम पार्क सोसायटी समोरील रस्ता व वैशाली स्वीट होम ते पुणे-नाशिक हायवे बायपास रस्ता धोकादायक बनला आहे.
येथील नागरिक आणि वाहनधारक पुरते वैतागले आहेत. खेडेगाव बरे अशी अवस्था परिसरात निर्माण झाली आहे. कॉलनीच्या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडून त्यात पाणी साचल्याने वाहने चलविणे जिकरीचे झाले आहे. पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात १४ जुलैला याबाबत पत्र दिले. त्यानंतरही स्थापत्य विभागाकडे अनेकवेळा पत्र व्यवहार करूनही निद्रिस्त यंत्रणेकडून प्रतिसाद मिळत नाही. या खड्डेमय रस्त्यांनी नागरिक हैराण झाले आहेत. पालिकेने येत्या २ दिवसांच्या आत रस्त्यांची डागडुजी करावी अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल.















