- विकास आराखड्यातून उभारलेल्या प्रकल्पांकडेही दुर्लक्ष…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑक्टोबर २०२२) :- तिर्थक्षेत्र विकास आराखड्यात देहूसाठी ३१ कोटी रुपयांचा सांडपाणी व मलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला. मात्र, हा प्रकल्प गेले अनेक महिने बंद आहे. त्यामुळे तीन गावांतील सांडपाणी सरळ इंद्रायणीच्या पाण्यात मिसळत आहे. परिणामी पाणी दूषित होवून दोन वेळा नदीतील मासे मृत झाले. तर येथे येणारे भाविकांना अशुद्ध नदीतील पाणी मिळत आहे. त्यातच हा प्रकल्प पूर्ण नसल्याचे कारण देत देहूनगर पंचायतने ताब्यात घेतला नाही. सध्या हा प्रकल्प बंद आहे.
देहू, माळवाडी, विठ्ठलवाडी अशा तीन गावांसाठी प्रकल्प उभारण्यात आला. ३० किलोमीटरवर पाइप टाकलेले आहेत. गायरणात मलशुदीकरण केंद्र उभारले. नदीतीराच्या बाजुने सांडपाण्याचे पाइप टाकण्यात आले आहेत. तसेच चेंबर आहे. मात्र हे चेंबर फुटलेले अवस्थेत आहेत. त्यामुळे सांडपाणी नदीत मिसळत आहे. हा प्रकल्प नगरपंचायतने अद्याप ताब्यात घेतला नाही.
याबाबत नगरपंचायत मधील गटनेते योगेश परंडवाल यांनी सांगितले की, गावातील सांडपाणी एसटीपी प्लांटपर्यंत जात नाही. तीन वेळा बैठक होवूनही योजना सुरू करुन देण्याचीही ठेकेदारला मागणी केली. गेले आठवड्यात जिल्हधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली. त्यातही योजना रन करुन द्या. १२०० सर्व्हिस चेंबर दाखवा. मुख्य चेंबर दाखवा, दुरुस्ती करुन द्या, अशी मागणी नगरपंचायतीने केली आहे. मात्र, त्यावर उपाय झाला नाही. सद्यःस्थितीत योजना बंद आहे.
दरम्यान १७५ कोटी रुपये खर्च करून देहूत विकास आराखड्यात कामे झाली आहेत. हा विकास आराखडा विभागीय आयुक्त यांच्या अद्यक्षतेखाली राबविला गेला. मात्र, राबवीत असताना त्या-त्या खात्याकडून लक्ष दिले जात नाही, अशी तक्रार नागरिक करीत आहेत. भविष्यकाळात मुख्यमंत्र्यांनी विकास आराखड्यात निधी देताना शासकीय अधिकाऱ्यांबरोबर स्थानिक लोकांना विचारून कामे करावीत, अशी चर्चा नागरिक करत आहेत.


















