न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑक्टोबर २०२२) :- काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर हे दोघे अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते. यामध्ये मल्लिकार्जुन खर्गे विजयी झाले आहेत. या दोन्ही उमेदवारांचे आणि काँग्रेस पक्षाचे भवितव्य सोमवारी मतपेट्यांमध्ये बंद झाले होते. या निवडणुकीमुळे काँग्रेसला दोन दशकांहून अधिक काळानंतर प्रथमच गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष मिळणार आहे.
काँग्रेसच्या १३७ वर्षाच्या इतिहासात सहाव्यांदा अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली आहे. या दोन्ही उमेदवारांचे आणि काँग्रेस पक्षाचे भवितव्य सोमवारी मतपेट्यांमध्ये बंद झाले होते. अध्यक्षपद निवडणुकीसाठी जवळपास ९६ टक्के मतदान झालं होतं. २४ अकबर रोड येथील काँग्रेस मुख्यालयात सकाळी दहा वाजेपासून मतमोजणीला सुरूवात झाली होती.
राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये काँग्रेसचं अध्यक्षपद सोडलं होतं. त्यानंतर सोनिया गांधी हंगामी अध्यक्ष म्हणून काम बघत होत्या मात्र पक्षाची देशभरातील एकंदरीत स्थिती पाहता पक्षाचं नेतृत्व करण्यासाठी अध्यक्ष असणं गरजेचे असल्याचे वेळोवेळी दिसून आलं आहे. अध्यक्षांची मागणी होताना अध्यक्ष गांधी घराण्यातीलच व्हावा अशी अनेकांची इच्छा होती, मात्र राहुल गांधींचा अध्यक्षपद स्वीकारण्यासाठीचा नकार, सोनिया गांधी यांची खालावलेली तब्येत आणि प्रियांका गांधी वड्रा यांच्या हाती फारसं यश न लागणं या सर्व गोष्टींमुळे ‘नॉन-गांधी’ हाच एक पर्याय पक्षाकडे राहिला होता.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीत खर्गे यांनी शशी थरूर यांचा पराभव केला आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे यांना ७,८९७ मते मिळाली आहेत. तर शशी थरूर यांना सुमारे १,००० मते मिळाली असून ४१६ मते बाद ठरली आहेत. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी ९६ टक्के मतदान झाले होते. आज मंगळवारी (दि.१९) मतमोजणी झाली. खर्गे यांना गांधी कुटुंबाचा पाठिंबा राहिला असल्याचे समजते. काँग्रेसच्या बहुतांश वरिष्ठ नेत्यांनी खर्गे यांना पाठिंबा जाहीर केला होता. यामुळे त्यांचा विजय या निवडणुकीत निश्चित होता.


















