न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ ऑक्टोबर २०२२) :- पुणे जिल्हा, पुणे, पिंपरी चिंचवड शहराच्या नियोजित विकासाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत वर्षा या शासकीय निवासस्थानी शिवसेना व भाजपची बैठक गुरुवारी झाली. त्यात पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप एकत्रित लढविणार असल्याचे सुतोवाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
मुंबईतील बैठकीस खासदार श्रीरंग बारणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव, माजी राज्यमंत्री विजय शिवतरे, बाळा भेगडे, आमदार महेश लांडगे, राहूल कुल, शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, पुणे महापालिकेचे माजी सभागृह नेते गणेश बिडकर आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत एकत्रित बैठक होणार होती.
पुणे जिल्हा, पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील निवडणुकाबाबत बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. राज्यात बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपचे सरकार आल्यानंतर विकासाला अधिक गती मिळाली आहे. पुणे जिल्ह्यात कायमच राष्ट्रवादीचे प्राबल्य राहिले परंतु, राज्य सरकारच्या माध्यमातून बारामतीचा विकास झाला. त्या तुलनेत इतर भागांच्या विकासाकडे पवारांचे लक्ष राहिले नाही. नागरिकांनी सन २०१७ मध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेची सत्ता भाजपकडे दिली होती. जिल्ह्यातील शिवसेना आणि भाजप नेत्यांच्या समन्वयासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत पूर्वी एक बैठक झाली होती.
















