न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ ऑक्टोबर २०२२) :- चैतन्याचा बहर घेऊन आलेल्या दीपोत्सवास आज शुक्रवारपासून सुरवात झाली. गोवत्स द्वादशी अर्थात वसुबारस आज घराघरांत साजरी झाली. अंगणी सडा, त्यावर रंगीबेरंगी रांगोळ्या अन् भोवती पणत्याचा झगमगाट, वैविध्यपूर्ण आकाश कंदिलांचा रंगीत प्रकाश सर्वत्र दाटला.
वसुबारस निमित्त आज सायंकाळी चिंचवडगावातील धनेश्वर महादेव मंदिरात गाय-वासरांचे मनोभावे पूजन करण्यात आले. हिंदू धर्मात गाईला महत्त्व आहे, तिच्या प्रती आदर म्हणून सवत्स धेनूची पूजा केली जाते. ज्या ठिकाणी गाय-वासरू उपलब्ध आहे, त्यांनी त्यांचे पूजन केले. गोमातेच्या पायावर पाणी आणि हार फुलांनी पूजा केली. काही ठिकाणी सवत्स धेनू नाही, त्यांनी मातीच्या बनविलेल्या प्रतिकृतीचे मनोभावे पूजन केले.