न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ नोव्हेंबर २०२२) :- १९५० आणि १९६० पूर्वीच्या वाहनांना आता नवीन नंबर घ्यावा लागणार आहे. या वाहनांची पुनरनोंदणी केल्यानंतर त्यांना नवा नंबर देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रतिवाहन २० हजार रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे ज्यांच्याकडे विंटेज आणि क्लासिक वाहने आहेत त्यांना आरटीओ कार्यालयाकडे धाव घ्यावी लागणार आहे.
वाहनाचे रजिस्ट्रेशन १९५० पूर्वी केले असेल, ते वाहन व्यावसायिक वापरासाठी तसेच मालकी असेल तर अशा वाहनाला विंटेज वाहन असे म्हणतात. हे वाहन केवळ प्रदर्शनासाठी किंवा विंटेज कार रॅलीसाठीच रस्त्यावर उतरवले जाऊ शकते, असे धोरण केंद्रीय महामार्ग व परिवहन मंत्रालयाने घोषित केले आहे.
साधारण ३० ते ३५ वर्षांपूर्वी रस्त्यावर उतरलेल्या वाहनाला क्लासिक वाहन असे म्हणतात. मात्र, साधारणपणे १९६० च्या दशकात रस्त्यावर आलेली वाहने क्लासिक म्हणून गणली जातात. क्लासिक वाहने तीन गटांमध्ये विभागली गेली आहेत. क्लासिक कार क्लासिक हलकी व्यावसायिक वाहने आणि क्लासिक ऑफ रोड वाहने असे हे तीन विभाग आहेत. विंटेज वाहनाची नोंदणी तसेच पुनरनोंदणी करण्यासाठी केंद्र सरकारने धोरण जाहीर केले आहे. त्या धोरणासाठी विंटेज वाहनाच्या नोंदणीसाठी तब्बल २० हजार रुपये नोंदणी शुल्क म्हणून द्यावे लागणार आहे. तर पुनरनोंदणीसाठी पाच हजार रुपये द्यावे लागणार आहेत. विंटेज वाहनाची नोंदणी अथवा पुनरनोंदणी असलेल्या वाहन क्रमांक सिरियल नुसार नंबर मिळेल. नव्या नंबरमुळे वाहनाचे वेगळेपण दूर होईल. मात्र, विंटेज वाहनांची नोंदणी नगण्य असल्याची माहिती आरटीओ कार्यालयातील सूत्रांनी दिली.
अशी करा नोंदणी…
केंद्र सरकारच्या नियमानुसार विंटेज वाहनाची नव्याने नोंदणी करण्यासाठी आणि नवीन नंबर मिळवण्यासाठी अॅप्लिकेशन फॉर्म २० नुसार आरटीओ कार्यालयात गाडीचा विमा, गाडी पूर्वी रजिस्टर केलेली असेल तर ते आरसी बुक घेऊन हजर राहून वाहन नोंदणीसाठी अर्ज करावा. या अर्जानंतर ६० दिवसांनी नोंदणी प्रमाणपत्र आरटीओ कार्यालयाकडून दिले जाते.


















