न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ नोव्हेंबर २०२२) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वतीने टाकाऊ साहित्यांतून तयार केलेले आकर्षक शिल्प शहरातील विविध चौकांत लावण्यात आले आहेत. काही महिने उलटले तरी, शिल्प कापड्यात झाकलेल्या अवस्थेत आहेत. त्या शिल्पाचे लवकरच अनावरण केले जाईल, असे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले होते. मात्र, अजूनही हे शिल्प उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत.
टाकाऊ साहित्यांतून नवनिर्मिती करीत पालिकेने शहरातील विविध १५ चौकांत शिल्प उभारले आहेत. त्या भोवती आकर्षक बांधकाम करण्यात आले आहे. त्या शिल्पाचे अनावरण तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ११ जूनला होणार होते. मात्र तो दौरा अचानक रद्द झाला.
त्यानंतर काही दिवसांत राज्यात सत्तांतर झाले. तसेच, पालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांचीही अचानक बदली झाली. त्यामुळे १५ पैकी बहुतांश शिल्पांचे अद्याप अनावरण झालेले नाही. ते शिल्प कपड्याने झाकून ठेवण्यात आली आहेत. पावसामुळे त्यांची दुरवस्था झाली आहे. महापालिका आयुक्तांनी लवकरात लवकर या शिल्पांचे अनावरण करावे, अशी मागणी नागरिक करू लागले आहेत.
















