न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ नोव्हेंबर २०२२) :- प्रवाशी संख्या कमी असल्याचे कारण देत पीएमपीने येरवडा मार्गे जाणारी मोशी ते पुणे स्टेशन बस सेवा बंद केली आहे. पीएमपीच्या या निर्णयाने प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून ही बससेवा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी मोशी परिसरातील नागरिक करत आहेत.
मोशी, चाकण परिसरातून पुणे शहरात जाण्यासाठी वाकडेवाडीमार्गे चाकण ते पुणे स्टेशन किंवा मोशी ते पुणे स्टेशन या मार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. तरीही प्रशासनाने बस सेवा सुरु करण्याकडे दुर्लक्ष केले आहे.
मोशी परिसरातून कामासाठी पुण्यात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या अधिक आहे. त्यांच्यासाठी अनेक वर्षांपासून राजगुरुनगर ते पुणे स्टेशन, चाकण ते मनपा अशी नियमित बससेवा सुरू होती. राजगुरुनगर ते पुणे स्टेशन हा सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारा मार्ग पीएमपीएमएलने जाहीर केला होता. या मार्गावर प्रवासी संख्येत देखील वाढ होत होती. राजगुरुनगर येथून आलेल्या बसमध्ये प्रवाशांची संख्या अधिक होती. त्यामुळे ही बस मोशी आणि इतर बस थांब्यावर थांबत नव्हती. त्या विरोधात मोशीतील नागरिकांनी वेळोवेळी रोष व्यक्त केला होता. त्यानंतर पीएमपीएलने मोशी ते पुणे स्टेशन, येरवडा मार्गे बस सेवा सुरू केली होती.


















