न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ नोव्हेंबर २०२२) :- पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी मेट्रो, पीएमआरडीएसह काही संस्थांनी पुणे व पिंपरी वाहतूक पोलिसांना ८०३ ट्रॅफिक वॉर्डन उपलब्ध करून दिले आहेत. ज्या भागामध्ये प्रकल्पांच्या कामामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. तसेच अन्य गर्दीच्या चौकांमध्ये जेथे पोलीस मनुष्यबळाअभावी नियंत्रणामध्ये अडचणी येत आहेत, त्याठिकाणी हे ट्रॅफिक वॉर्डन उपलब्ध करून दिले जातील, अशी माहिती पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.
यावर्षी पाऊस काळापासून आजपर्यंत दोन्ही शहरात वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. दहा पंधरा मिनिटांच्या प्रवासाला नागरिकांना तास दीड तास थांबावे लागत आहे. महापालिकेच्या विविध विकास कामांमुळे व मेट्रोमुळे शहरात जागोजागी खड्डे खोदले गेल्याने अनेक ठिकाणी मोठी वाहतूक ठप्प होत आहे. गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळीपूर्वीच्या खरेदी दरम्यान तर येथील रस्त्यांवर पायी चालणे देखील कठीण झाले होते.
रस्त्यांवर कोंडी होत असताना नियंत्रण करणारे वाहतूक पोलिसांचे अस्तित्व दिसत नव्हते. याउलट पोलिस आडवाटेला कोपऱ्यामध्ये थांबून दंडात्मक कारवाई करताना दिसत होते. यावरून पोलीस दलावर सर्वच स्तरावरून टीका होत होती. परंतु पोलिसांकडून मनुष्यबळाचा अभाव हे कारण सांगून जबाबदारी झटकण्याकडे कल अधिक दिसून येत होता. दरम्यान, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिवाळीच्या काळात पोलीस ठाण्यांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वाहतूक नियंत्रणाचे अतिरिक्त काम सोपविले होते.
असे पुरविले जाणार मनुष्यबळ
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुण्यासाठी ३३१ आणि पिंपरी चिंचवडसाठी ३३, महामेट्रोने २६४, पीएमआरडीएने दिवस आणि रात्रपाळीमध्ये ४१६, गोल्फ क्लबने ३७ आणि सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीने २० ट्रॅफिक वॉर्डन पुरविले आहेत. या सर्वांची यादी अगदी मोबाइल क्रमांकासह वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेच्या प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला यांनी दिली.


















