- शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांचे हेतुपूर्वक पत्र…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ नोव्हेंबर २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निगडी व निगडी विभागाच्या जवळच्या क्षेत्रातील रेडझोन सीमा निश्चितीचे काम अंतिम टप्प्यात असताना शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी रेडझोन’ हद्दीबाबत दिलेले पत्र म्हणजे ‘आयत्या पिठावर रेघोट्या’ मारण्याचे काम आहे. अशी जहरी टिका भाजपचे माजी नगरसेवक प्रा.उत्तम केंदळे यांनी केली आहे.
याबाबत उत्तम केंदळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आमदार महेश लांडगे यांच्या सूचनेनुसार निगडी व निगडी विभागाच्या जवळच्या क्षेत्रातील नागरिकांना वारंवार भेडसावणाऱ्या रेडझोनच्या प्रश्नसंदर्भात गेल्या पाच वर्षांपासून आम्ही प्रशासनाकडे योग्य तो पाठपुरावा करीत आहोत. आम्ही केलेल्या विनंतीवरून आमदार महेश लांडगे यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालय तसेच पिंपरी महापालिकेत दोन बैठका घेतल्या होत्या. तसेच दि. ५ ऑगस्ट २०२१ रोजी आम्ही दिलेला पत्राच्या आधारे पिंपरी महापालिकेत आयुक्त, नगररचना तसेच भूमी जिंदगी विभागातील अधिकाऱ्यांची दोन वेळा ‘समन्वयाची बैठक’ आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मा. आयुक्तांनी नगररचना विभागामार्फत रेड झोन संदर्भात नकाशे अध्यारोपण (super impose) करून रेड झोन बाबतची प्रकरणे वअभिप्राय देण्यासंदर्भात निर्देश दिले होते. निगडी व निगडी विभागाच्या जवळच्या क्षेत्रातील रेडझोन मोजणीचे हद्द कायम करण्यासाठीची कार्यवाही ही अंतिम टप्प्यात आहे. यामुळे कृष्णानगर, यमुनानगर, वाहतूकनगरी, निगडी-साईनाथनगर, से.नं.२२, से.नं. २४ प्राधिकरण ( से.नं.२०/२१/२२/२३/२४) मधील सुमारे पाच ते सहा हजार नागरिकांना दिलासा मिळणार आहे. डॉ.नीलम गोऱ्हे या महाराष्ट्रातील अभ्यासू नेत्या आहेत. त्यांचा आम्ही आदर करतो. त्यांच्या पत्रावरून त्यांना दुखावण्याचा आमचा कोणताही हेतू नाही परंतू, त्यांनी दिलेल्या पत्रातून नेमकी स्पष्टता होत नाही, असे त्या पत्रातून लक्षात येते. त्यामुळे एखाद्या कार्यकर्त्याच्या सांगण्यावरून गोऱ्हे यांनी दिलेल्या पत्रामुळे संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळे त्यांनी या संदर्भात संपूर्ण माहिती घ्यावी, अशी विनंती उत्तम केंदळे यांनी केली आहे.
शरदनगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प हा रेडझोनमध्ये येत नसल्याचे पुण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी पत्रकाद्वारे जाहीर केलेले आहे. तरी देखील शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पुणे विभागीय आयुक्तांना दिलेल्या पत्रानुसार फक्त शरदनगर येथे राबविण्यात आलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाला जाणीवपूर्वक लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे. कोणतीही माहिती न घेता शरदनगर येथे राबविण्यात आलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाला विरोध करण्यात आला आहे. प्रकल्पाला विरोध करून गरीब झोपडपट्टीधारकांना घरापासून वंचित ठेऊन डॉ. नीलम गोऱ्हे यांना नेमके काय साध्य करायचे आहे? याचा खुलासा त्यांनी करावा, असे उत्तम केंदळे यांनी म्हटले आहे.


















