न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ नोव्हेंबर २०२२) :- क्षयरुग्णांना उपचार कालावधीमध्ये पोषण आहार व इतर साहाय्य मिळावे, यासाठी त्यांना दत्तक घेऊन त्यांचे निक्षय मित्र व्हा, असे आवाहन महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.
या अभियानाअंतर्गत आयुक्त शेखर सिंह, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी प्रत्येकी २ क्षयरुग्णांना (टी.बी.) पोषण आहार देऊन त्यांची निक्षय मित्र म्हणून नोंदणी केली आहे.
केंद्र शासनाने क्षय रुग्णांच्या पोषणासाठी (कोरडे शिधा) दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रति क्षयरुग्ण, प्रतिमहा ७०० ते ८०० रुपये खर्च येतो. पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील विविध सेवाभावी संस्था, औद्योगिक संस्था, सहकारी संस्था, राजकीय पक्ष निवडून आलेले प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते तसेच सामान्य जनता रुग्णांचे निक्षय मित्र होऊन त्यांना मदत करू शकतात. संसर्गजन्य आजारामुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये क्षयरोगाचा समावेश प्रमुख दहा हजार रोगांमध्ये आहे. क्षयरुग्णांना उपचार कालावधीमध्ये पुरेसा पोषक आहार मिळाल्यास रोग बरा होण्याचे प्रमाण वाढते.
असे होऊ शकता तुम्हीही निक्षय मित्र
निक्षय मित्र नोंदणीसाठी पिपरी चिंचवड महापालिकेचा कोणताही दवाखाना व रुग्णालयातील टीबी विभागाशी संपर्क साधावा. त्याठिकाणी उपलब्ध असलेले कर्मचारी निक्षय मित्र होण्याबाबत मार्गदर्शन करतील. तसेच एका निक्षय मित्राने किमान सहा महिने क्षयरुग्ण दत्तक घेणे आवश्यक आहे.
















