न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ नोव्हेंबर २०२२) :- पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) कार्याची व्यप्ती वाढल्याने प्राधिकरनाणे नवीन अतिरिक्त आयुक्त पदाची निर्मिती करून त्यावर आयएएस दर्जाचे अधिकारी दीपक सिंघल यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल महिवाल यांच्या कामकाजाची विभागणी करण्यात आली असून सिंगल यांच्याकडे स्वतंत्र अधिकार देण्यात आले आहेत.
तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे (पीसीएनटीडीए) पीएमआरडीएमध्ये विलीनीकरण करण्यात आले. त्यामुळे पीसीएनटीडीएचे आरक्षित भूखंड, ९० वर्षाच्या करारावर दिलेले भूखंड, उभारण्यात येणारे गृह प्रकल्प, रस्ते, नदीसुधार आदी प्रकल्प पीएमआरडीएमध्ये विलीन झाले. या प्रकल्पांसह ग्रामीण भागातील कार्याची व्याप्ती वाढल्याने पीएमआरडीएच्या प्रशासकीय कामकाजात विभागणी करण्यात आली आहे.
अतिरिक्त आयुक्त सिंगल यांच्याकडे अतिक्रमण, जमीन मालमत्ता, स्थापत्य, रिंग रोड १ या प्रकल्पांसह २५ लाख रुपयांचे वित्त अधिकार देण्यात आले आहेत. त्यापुढील खर्चाचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी महिवाल यांच्याकडे राहतील.