न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ नोव्हेंबर २०२२) :- भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या उपस्थितीत मंगळवार (दि.८) ते गुरूवार (दि.१०) या कालावधीत पुणे शहर व म्हाळुंगे-बालेवाडी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त आयुक्त कुमार यांचे संपर्क अधिकारी म्हणून पालिकेचे उपायुक्त सचिन ढोले यांची तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या वतीने छायाचित्र मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. प्रारूप मतदार यादी बुधवारी (दि.९) प्रसिद्ध केली जाणार आहे. त्या निमित्ताने तीन दिवस सायकल फेरी, व्हीएएफ कार्यक्रम, प्रदर्शन व विशेष नोंदणी मोहिम असे विविध कार्यक्रम आयोजित केले आहे.
या कार्यक्रमांना मुख्य निवडणूक आयुक्त कुमार, निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे व इतर प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त कुमार यांचे संपर्क अधिकारी म्हणून उपायुक्त ढोले हे तीन दिवस काम पाहणार आहेत.
दरम्यान म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथून सकाळी सहाला रॅली निघणार आहे. त्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी केले आहे.
शिवछत्रपती क्रीडा संकुल येथून निघालेली सायकल रॅली पुणे विद्यापीठ व परत बालेवारी येथे येणार आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक वळविण्यात आली आहे. हिंजवडी वाहतूक विभागांतर्गत वाहतुकीतील हा बदल बुधवारी पहाटे पाच ते सकाळी नऊ या वेळेसाठी करण्यात आला आहे.
बालेवाडीकडून राधा चौकमार्गे बाणेरकडे जाणारी वाहने राधा चौकातून न जाता इतर मार्गांनी जातील. न्याती शोरूमकडून सेवा रस्त्याने राधा चौकात येणारी वाहने ही मुख्य महामार्गावरून पुढे भुजबळ चौक (वाकडनाका) सेवा रस्त्याने इच्छित स्थळी जातील. भुजबळ चौकातून (वाकडनाका) सेवा रस्त्याने राधा चौकात येणारी वाहने ही राधा चौकात न येता इतर पर्यायी मार्गाने इच्छित स्थळी जातील.















