न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ नोव्हेंबर २०२२) :- “सद्गुरुभक्ती हीच परमेश्वरभक्ती होय!” असे विचार ह.भ.प. बालाजीमहाराज कुलथे यांनी अशोका कॉलनी, थेरगाव येथे सोमवार, दिनांक ०७ नोव्हेंबर २०२२ रोजी व्यक्त केले. श्री सद्गुरू साधुबाबामहाराज ब्रह्मसंप्रदाय संस्था, थेरगाव आयोजित श्री सद्गुरू गाडे आण्णा महाराज यांच्या सहाव्या पुण्यतिथी सोहळ्यात ह.भ.प. कुलथेमहाराज बोलत होते.
ह.भ.प. अशोकमहाराज गोरे, ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कंक, शोभा जोशी, तानाजी एकोंडे, राधाबाई वाघमारे, सुभाष चव्हाण, जयश्री गोवंडे, नारायण कुंभार, संगीता सलवाजी, दिलीप कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती.
ह.भ.प. बालाजीमहाराज कुलथे यांनी संत एकनाथमहाराज यांच्या ओवीवर निरूपण करताना, “मृत्युलोकी मानवी देह हा अप्राप्य आहे, हे संतांनी ओळखले; परंतु सामान्य प्रापंचिक माणसाला या अनमोल देहाची किंमत वाटत नाही. त्यामुळे तो मोहपाशात अडकतो, व्यसनाधीन होतो. वास्तविक स्वर्गातील देवदेवताही मानवी देह धारण करायला मिळावा म्हणून अवतार घेण्याची आकांक्षा बाळगतात; कारण मानवाला देहाच्या माध्यमातून परमेश्वरभक्ती करता येते. संत किंवा सद्गुरू सामान्य माणसाला परमार्थाची शिकवण देतात म्हणूनच सद्गुरुभक्ती हा परमेश्वराच्या सान्निध्यात जाण्याचा मार्ग आहे!” भक्त प्रल्हाद, ज्ञानेश्वरमाउली, शंकरमहाराज, गाडेआण्णामहाराज यांचे संदर्भ उद्धृत करून त्यांनी भाविकांना अंतर्मुख केले.
श्री सद्गुरू साधुबाबा महाराज ब्रह्मसंप्रदाय संस्था, थेरगाव साधक परिवाराने संयोजनात परिश्रम घेतले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश कंक यांनी आभार मानले.















