न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० नोव्हेंबर २०२२) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकासकामांच्या निविदा दरापेक्षा तब्बल ४३ टक्के कमी दराने निविदा पात्र ठरत आहेत. इतक्या कमी दरात ठेकेदारांकडून संबंधित कामाची गुणवत्ता व दर्जा राखला जातो का? अधिकारी खर्च निश्चित करण्यात अपयशी ठरत आहेत का?, असे मुद्दे उपस्थित करीत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर रोष व्यक्त केला. कमी दराने निविदा पात्र ठरल्यास जबाबदारी निश्चित केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
पालिकेच्या वतीने खराळवाडी येथील बालभवन शाळेच्या इमारतीची स्थापत्यविषयक कामे करण्यात येणार आहे. त्यासाठी स्थापत्य विभागाने निविदा प्रक्रिया राबविली. त्यासाठी ५४ लाख ७८ हजार खर्चाची निविदा १९ जुलै २०२२ ला झाली. त्यामध्ये एकूण १३ ठेकेदारांनी भाग घेतला. एस. एस. एंटरप्रायजेस या ठेकेदाराने तब्बल ४३.०१ टक्के कमी दर सादर केला. सर्वाधिक कमी दर आल्याने प्रशासनाने शाळेचे स्थापत्यविषयक काम त्या ठेकेदाराला देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला होता.
त्या प्रस्तावावर चर्चा करताना आयुक्त सिंह यांनी एवढ्या कमी दराने निविदा आल्याने प्रश्न उपस्थित केले. त्यांनी स्थापत्य विभागाच्या अधिकाऱ्यांना एवढा कमी दर सादर केल्याने ठेकेदार चांगले काम करणार आहे का, असा थेट सवाल केला. कामाचा दर्जा राखला जाणार का? इतक्या कमी दरात त्याला परवडणार का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. त्याबाबत स्थापत्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी खुलासा केला. दरम्यान, निविदा दरापेक्षा मोठ्या प्रमाणावर कमी दर सादर करून निविदा मिळवण्यासाठी ठेकेदारांमध्ये चढाओढ दिसते. मात्र, निविदा दरापेक्षा कमी दर घेऊन तोटा होण्याची शक्यता असल्याने ठेकेदार काम न करण्याची शक्यता असते. त्यामुळे ३० टक्क्यापेक्षा कमी दर सादर केल्यास अपात्र करण्याचा नियम आहे. मात्र, सद्यस्थितीत सर्व निमय डावलून प्रशासकीय राजवटीत अशा कामांना मंजुरी दिली जात आहे.
















