न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० नोव्हेंबर २०२२) :- अपहरण, बाल लैंगिक अत्याचार आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमान्वये दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीला २३ वर्षे सश्रम कारावास आणि १० हजारांच्या दंडाची शिक्षा झाली. गुन्हा दाखल झाल्यानंतर आठ महिन्यांनी निकाल लागला. त्यामुळे यातील पीडित अल्पवयीन मुलीला न्याय मिळाला.
मंगेश रामदास भानुसे असे आरोपीचे नाव आहे. त्याने १४ जानेवारी रोजी रात्री आठच्यासुमारास १६ वर्षीय मुलीचे चारचाकी वाहनामधून अपहरण केले. मारुंजी कॅनॉलवर गाडी थांबवून त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर मुलीला भूमकर चौकात सोडून तो निघून गेला. याप्रकरणी लैंगिक अत्याचार, अपहरण, बाल लैंगिक अत्याचार, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमान्वये हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत मोहिते यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. पुराव्यांसह गुन्ह्याचे दोषारोपपत्र पोलिसांकडून विशेष जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय, शिवाजीनगर येथे सादर करण्यात आले.
त्यानंतर सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले यांच्याकडे या प्रकरणाचा तपासदरम्यान, आरोपीने केलेल्या जामिनासाठी देखील पोलिसांकडून विरोध करण्यात आला. हे प्रकरण न्यायालयाच्या बोर्डावर आले असता, पोलिसांनी सर्व बाबींची पूर्तता केली. त्यानुसार न्यायालयाने आरोपीला अपहरणाच्या गुन्ह्यात तीन वर्षे सश्रम कारावास आणि तीन हजार रुपये दंड आणि लैंगिक अत्याचार प्रकरणात २० वर्षे सक्तमजुरी आणि सात हजार रुपये आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली.
















