न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ फेब्रु.) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या संभाजीनगर येथील प्रस्तावित लेझर शो आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीकडूनच साकारण्यात येणार आहे. त्यासाठी जर्मन बनावटीची यंत्रसामग्री उपयोगात आणून हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. हे माजी महापौर मंगला कदम यांना कदाचित ज्ञात नसावे. प्रसिद्धी मिळवण्यासाठी कदम यांनी केलेले आरोप पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाला बाधक ठरत आहे, असे स्थायी समितीचे अध्यक्ष ममता गायकवाड यांनी मंगळवारी सांगितले.
चिंचवडच्या संभाजीनगर येथे लेझर शो प्रकल्प राबविण्याचा नियोजन २०१५ -१६ या आर्थिक वर्षात करण्यात आले. त्यासाठी त्यावर्षाच्या अंदाजपत्रकात आवश्यक तरतूद केली. तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादीच्या कार्यकाळात पक्षनेत्या राहिलेल्या मंगला कदम यांनी या लेझर शोच्या निविदेत हस्तक्षेप केला होता. त्यांचे लागेबांधे असलेल्या कंत्राटदाराला निविदेत सहभागी होण्यासाठी साजेशा अटी – शर्ती लागू केल्या होत्या. परंतु, त्यांच्या निष्र्कीय कार्यपद्धतीमुळे लेझर शोचे काम रेंगाळले.
हा प्रकल्प दर्जेदार पद्धतीने साकारण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अनेक कंपन्यांचे सादरीकरण घेतले. त्यानुसार निविदेमध्ये आवश्यक ते बदल केले आहेत. टेक्निकल बाबींचा सखोल अभ्यास करूनच, आयुक्तांनी या प्रकल्पाची नविन निविदा तयार केली आहे. जुन्या आणि नवीन निविदेमध्ये नाममात्र बदल दिसून येत असला, तरी लेझर शोचा दर्जा टिकून रहावा यासाठी आयुक्तांनी तांत्रिक बाबींची पूर्तता केली. त्यामुळे विलंब झाला. मात्र, मा. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून श्रीकांत भारती यांचा हस्तक्षेप झाल्याचा आरोप कदम यांनी केला हा धादांत खोटा आरोप आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून कुठलाही फोन आलेला नाही. केवळ स्वतःची प्रसिद्ध करण्यासाठी कदम यांनी आमच्यावर बिनबुडाचे आरोप केले आहेत, असेही स्थायी समिती सभापती गायकवाड यांनी म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीकडूनच हा प्रकल्प पूर्ण करण्यात येईल. या प्रकल्पाचा आराखडा कोणाच्या सांगण्यानुसार बदललेला नाही. प्रकल्पाचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी नवीन निविदेमध्ये अत्याधुनिक तांत्रिक पद्धतीचा विचार करून बदल केलेला आहे. नवीन निविदेमुळे महापालिकेचे नुकसान होणार नाही. उलट पिंपरी-चिंचवडमधला हा प्रकल्प नावीन्यपूर्ण ठरणार आहे. नवीन निविदेमध्ये ऑटोमॅटिक पंप, नोझल व इतर सर्व साहित्य हे जर्मन बनावटीचे वापरण्यात येणार आहेत. पूर्वीचा निविदेपेक्षा नवीन निविदेतील तरतुदीमुळे जास्त सुविधा मिळणार असल्यामुळे आता लेझर शो अधिक आकर्षक व अत्याधुनिक तंत्रानी विकसित करून सादर करण्यात येईल, असे गायकवाड स्पष्ट केले.











