न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ नोव्हेंबर २०२२) :- अदखलपात्र गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिस नोटीस देत असताना नोटीस घेण्यास नकार दिला. तसेच पोलिस ठाण्यात येऊन आरडाओरडा करीत आत्महत्येची धमकी देत वरिष्ठ निरीक्षकांसह इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा प्रकार देहूरोड पोलिस ठाण्यात घडला.
विक्रम विजय स्वामी (वय ३१, रा. पोर्टर चाळ, देहूरोड) असे अटक आरोपीचे नाव आहे. तर ३२ वर्षीय दोन महिलांवर गुन्हा दाखल आहे. पोलिस हवालदार निशांत ठोकळे यांनी फिर्याद दिली आहे. एका प्रकरणात देहूरोड पोलिसांनी परस्परविरोधी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. तसेच दोन्ही बाजूच्या प्रकरणातील आरोपींना प्रतिबंधात्मक नोटीस दिली. मात्र, आरोपीने नोटीस घेण्यास नकार दिला. त्यानंतर महिला आरोपीने पोलिस ठाण्यात थांबून आरडाओरडा करण्यास सुरवात केली.
”तुम्ही विरोधकांवर कारवाई करीत नाही”, असे म्हणत महिलेने आत्महत्या करण्याची धमकी दिली. तसेच वरिष्ठ पोलिस निरीक्षक पाटील यांच्यासह सहायक निरीक्षक गज्जेवार, पोलिस नाईक गवारी व महिला पोलिस हवालदार यांना शिवीगाळ केली. या घटनेचा पोलिस अधिक तपास करीत आहेत.
















