- फुल व्यापार्यांना मिळणार हक्काचा बाजार
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ फेब्रु.) :- पिंपरी शगुन चौक येथील व्यापार्यांचे लवकरच पुनर्वसन होणार असून, क्रोमा शेजारील जागा फुल विक्रेत्यांना देण्याला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे फुल आडत व्यापार्यांना आता हक्काचा बाजार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आज पिंपरी येथील फुल आडत व्यापार्यांनी महापौर राहुल जाधव यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.
यावेळी फुल संघटनेचे अध्यक्ष राजकुमार मोरे, पिंपरी उपबाजार प्रमुख राजू शिंदे, सचिव शिवाजी सस्ते, बाबा रासकर, बाबा तापकीर, अजित तापकीर, संतोष जाधव, अमोल राक्षे आदि उपस्थित होते.
गेली अनेक वर्षापासून पिंपरी येथे सकाळी फुल बाजार भरत आहे. मात्र, हा बाजार शगुन चौकातील रोडवर भरत असल्यामुळे अनेक अडचणींना येथील फुल आडत व्यापार्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच सकाळी १० वाजेपर्यंतच हा फुल व्यापार होत असल्याने शेतकर्यांच्या मालाला देखिल योग्य अशी किंमत मिळत नाही. प्रसंगी कवडीमोल किंमतीमध्ये हा माल विकावा लागतो. तसेच सणासुदीच्या काळात येथे वाहतुकी कोंडी देखिल मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे फुल बाजारासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मागील काही वर्षापासून येथील व्यापार्यांनी केली होती.
त्यानुसार पिंपरी उपबाजार प्रमुख राजु शिंदे यांनी यासाठी बाजार समितीकडे सातत्याने पाठपुरावा केला आणि पिंपरी चिंचवड शहरात फुल आडत व्यापार्यांना स्वतःचा बाजार उपलब्ध व्हावा, अशी आग्रही भुमिका त्यांनी मांडली. पिंपरी येथील क्रोमाशेजारी जागा फुल मार्केटला उपलब्ध करून देण्यात यावी यासाठी त्यांनी पिंपरी पालिकेकडे पत्र व्यवहार केला. नोव्हेंबर २०१८ मध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी व महापालिकेचे अधिकारी यांच्यामध्ये एक बैठक होऊन ही जागा फुल आडत व्यापार्यांना देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार तात्पुरते ३० पत्राशेडचे गाळे उभारून ते ११ महिन्याच्या भाडेतत्वावर या व्यापार्यांना देण्यात येणार आहे. या जागेत भविष्यात महापालिकेचे मल्टिस्टोअरेज पार्किंगची इमारत होणार असून, त्या इमारतीमधील तळमजला हा फुल विक्रेत्यांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे फुल आडत व्यापार्यांना आता हक्काचे बाजार उपलब्ध होणार असून लवकरच त्यांचे नवीन जागेत पुनर्वसन होणार असल्याने व्यापार्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
यावेळी बोलताना फुल आडत व्यापारी म्हणाले की, महापौर राहुल जाधव यांची महापौरपदी निवड झाल्यानंतर आम्ही त्यांची भेट घेतील. त्यावेळी महापौर जाधव म्हणाले होते की, पिंपरी फुल आडत व्यापार्यांच्या जागेचा प्रश्न मी लवकरच मार्गी लावणार आणि माझ्या हस्ते नवीन जागेचे उद्घाटन करणार त्यामुळे त्यांनी आम्हांला दिलेले शब्द पुर्ण केले. त्यामुळे आम्ही त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे पिंपरी उपबाजार प्रमुख राजु शिंदे यांनी या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा केला, आणि फुल बाजाराचे मिळवून दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही, अशी भुमिका त्यांनी घेतली, त्यामुळे आज आम्हांला हक्काचे फुलबाजार उपलब्ध होणार आहे, असे फुल आडत व्यापार्यांनी सांगितले.















