न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ नोव्हेंबर २०२२) :- अर्बन आऊटकम्स फ्रेमवर्क २०२२ च्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांबाबत पारदर्शक आणि सर्वसमावेशक डेटाबेस तयार करून ही माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महापालिका प्रयत्न करीत आहे. हा उपक्रम जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचावा यासाठी शहरातील नागरिक, विद्यार्थी, सामाजिक संस्था, गृहनिर्माण संस्था, शाळा, महाविद्यालये आणि विविध आस्थापना यांना या सिटीझन परसेप्शन सर्वेक्षणात सहभाग घेऊन आपले मत नोंदवावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले.
पिंपरी चिंचवड शहराला स्मार्ट सिटी बनविण्याच्या दृष्टीने सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्यांच्या दैनंदिन जीवनमानावर दुरगामी व सकारात्मक परिणाम करणा-या शाश्वत विकासाची प्रक्रिया उत्तम प्रकारे राबविण्यासाठी महानगरपालिका सातत्याने प्रयत्न करीत आहे. या धोरणाला अनुसरून केंद्र शासनाच्या अर्बन आउटकम्स फ्रेमवर्क २०२२ या उपक्रमा अंतर्गत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरात विविध उपक्रम आणि योजना राबविल्या जात आहेत. तसेच केंद्रीय गृहनिर्माण आणि शहर विकास मंत्रालयाद्वारे भारतातील शहरांमधील ऑनलाईन नागरी सुविधांची उपलब्धता आणि वापर समजून घेण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात येत आहे. अर्बन आउटकम्स फ्रेमवर्क २०२२ हा उपक्रम केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयाद्वारे दि. २३ डिसेंबर २०२२ पर्यंत राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत सिटीझन परसेप्शन सर्वेक्षण होणार आहे. यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांचा सहभाग करण्याच्या उद्देशाने योग्य पद्धतीने नियोजन करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागप्रमुख तसेच संबधित अधिकारी यांच्यासमवेत आढावा बैठक पार पडली, त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या बैठकीस मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी नीलकंठ पोमण, उपआयुक्त अजय चारठाणकर, रविकिरण घोडके, विशेष अधिकारी किरण गायकवाड, क्षेत्रीय अधिकारी सोनम देशमुख, उमाकांत गायकवाड, शितल वाकडे, सीताराम बहुरे, विजयकुमार थोरात, समाज विकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, स्मार्ट सिटी लिमिटेडचे जनसंपर्क अधिकारी सोयम अस्वार तसेच स्मार्ट सिटी, स्मार्ट सारथी, फॉक्सबेरीसह विविध माध्यम समन्वयक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
अतिरिक्त आयुक्त जगताप म्हणाले, महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असेलेले उपक्रम, योजना, प्रकल्प तसेच विशेष कार्य आदींबाबत नागरिकांचे मत जाणून घेण्यासाठी सिटीझन परसेप्शन सर्वेक्षण होणार आहे. पिंपरी चिंचवड शहर हे राहण्यायोग्य उत्तम शहर असून या शहरात दर्जेदार सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्न करीत आहे. त्यास अनुसरून होणारे सर्वेक्षण महत्वपूर्ण असून शहरातील नागरिक, विद्यार्थी, सामाजिक संस्था, गृहनिर्माण संस्था, शाळा, महाविद्यालये आणि विविध आस्थापना यांचा या सर्वेक्षणात सहभाग अपेक्षित आहे. या सर्वेक्षणामध्ये सहभागी होऊन पिंपरी चिंचवड शहराला या स्पर्धेमध्ये विजयी करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन जगताप यांनी यावेळी केले. आपल्या शहराचा युएलबी कोड ८०२८११ असून सर्वेक्षण फॉर्म भरण्यासाठी https://bit.ly/EOL2022 या लिंकवर क्लिक करून आपली प्रतिक्रिया नोंदवावी, असेही ते म्हणाले.
















