- महापालिका आणि पोलीस आयुक्तालयाचा पुढाकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ नोव्हेंबर २०२२) :- अशिक्षितपणा, व्यसनाधीनता आणि गुन्हेगारीकडे वळणाऱ्या मुलांना योग्य प्रवाहात आणण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस, महापालिका, सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून मदत केली जाणार आहे. यासाठी संयुक्तपणे ‘दिशा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. पोलीस स्टेशन स्तरावर ४०० पेक्षा अधिक महिला व समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याकडून संबंधित मुलांचे समुपदेशन केले जाणार आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस मुख्यालयात शुक्रवारी (दि. ११) बैठक झाली. या वेळी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, विवेक पाटील, सहायक आयुक्त सतीश माने, श्रीकांत डिसले, पोलीस निरीक्षक (विशेष बाल पथक) देवेंद्र चव्हाण, पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, समन्वयक, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड शहरात झोपडपट्ट्या आहेत. पोलीस ठाण्यांमध्ये दाखल होणाऱ्या गुन्ह्यांत अल्पवयीन मुलांचा सहभाग दिवसेंदिवस वाढत आहे. प्रामुख्याने झोपडपट्टीमधील बालकांचे गुन्हेगारीकडे वळण्याचे प्रमाण धक्कादायक आहे. झोपडपट्टी परिसरातील मुलांना योग्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष बाल पथक कार्यरत आहे. निगडी परिसरातील ओटास्किम येथील बालकांना योग्य दिशा देण्यासाठी पोलिसांकडून क्रीडा उपक्रम राबवला जात आहे, असे क्रीडा उपक्रम सर्व ठिकाणी घेतल्यास त्याचा फायदा होईल. घडण्याच्या वयात बिघडणाऱ्या मुलांना योग्य प्रवाहात आणण्यासाठी पोलीस, महापालिका, सामाजिक संस्था आदींच्या माध्यमातून ‘दिशा’ हा उपक्रम राबवला जात आहे. याबाबत पोलीस मुख्यालयात बैठक झाली. त्यामध्ये बालकांच्या सुरक्षित भविष्याबाबत चर्चा झाली.
” दिशा ” उपक्रमांतर्गत नेमणूक केलेल्या महिला, समन्वयक यांच्या माध्यमातून व्यसनाच्या आहारी गेलेले बालक, तसेच शाळाबाह्य बालकांना गुन्हेगारी मार्गावर जाण्यापासून परावृत्त करून त्यांना योग्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. हे समन्वयक विनामोबदला हे काम करणार आहेत. हे समन्वयक करत असलेले काम कौतुकास पात्र आहे. – अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त…
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने लाईट हाऊस हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून राबविण्यात येत असलेला उपक्रम उत्तम आहे. या उपक्रमासाठी पालिकेच्या महिला व बाल विकास विभागाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.
– चंद्रकांत इंदलकर, उपायुक्त, महिला व बालविकास विभाग, महापालिका…
















