न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ नोव्हेंबर २०२२) :- नौरोसजी वाडिया कॉलेजच्या प्र. प्राचार्यपदी डॉ. वसंत चाबुकस्वार यांची नियुक्ती झाल्याचे औचित्य साधून पुणे महानगरपालिकेच्या उपमहापौर सुनिता वाडेकर यांनी नौरोसजी वाडिया कॉलेजला सदिच्छा भेट दिली.
यावेळी कॉलेजच्या वतीने मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त प्रा. सचिन सानप यांनी उपमहापौर सुनीता वाडेकर यांचे स्वागत केले. तसेच मॉडर्न एज्युकेशन सोसायटीची परंपरा आणि नौरोसजी वाडिया कॉलेजमधील कार्यक्रम व उपक्रमांचा लेखाजोखा उपमहापौर यांना सांगितला.
उपमहापौर सुनीता वाडेकर म्हणाल्या, “आम्ही शिक्षणाला जास्त महत्त्व देतो. विद्यार्थ्यांसाठी जे जे काही करता येईल ते ते आम्ही करत असतो. आम्हाला केव्हाही हाक द्या, आम्ही त्यासाठी तत्पर असू.” असे आश्वासन त्यांनी दिले.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. वसंत चाबुकस्वार यांचे उपमहापौर सुनीता वाडेकर यांनी सत्कार करून अभिनंदन केले. तसेच प्राचार्य डॉ. वसंत चाबुकस्वार यांनी उपमहापौरांचे आभार मानले. यावेळी नौरोसजी वाडिया कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. भरत बहुले, प्रा. प्रमोद शिंदे, डॉ. समिंदर घोक्षे आदी उपस्थित होते.