न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ नोव्हेंबर २०२२) :- ठेकेदाराकडून मागासवर्गीय सफाई कामगार असणाऱ्या महिला आणि पुरुषांवर अन्याय केला जात आहे. आंदोलन केल्यामुळे हक्काच्या वेतनापासून वंचित ठेवले जात आहे. मानसिक छळ केला जात आहे. या आत्याचारांच्या निषेधार्थ कष्टकरी कामगार पंचायतच्या वतीने मंगळवारी (दि. १५) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन व थाळी नाद करण्यात येणार आहे. दुपारी तीन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत कष्टकरी कामगार पंचायतच्या आशा बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती, कष्टकरी कामगार पंचायतच्या सरचिटणीस मधुरा डांगे, कार्याध्यक्ष बलिराम काकडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, हक्काचे वेतन, बोनस मिळावे या मागणीसाठी सफाई कामगारांनी दिवाळीमध्ये महापालिकेसमोर आंदोलन केले होते. तेव्हापासून कामगारांना अधिकारी व ठेकेदार त्रास देत आहेत. आंदोलन केल्यामुळे अधिकाऱ्यांनी दंड आकारला आहे. तर दुसऱ्या बाजूला ठेकेदार मानसिक छळ करत आहेत. कामगारांना अधिकची कामे करायला सांगितले जात आहे. गोठ्यामध्ये शेण काढायला लावे, माती उचलायला लावणे, जलपर्णी काढण्याची कामे दिली जात आहेत. अतिरिक्त कामे दिली जात असून ती न केल्यास कामावरून कमी करण्याची धमकी दिली जात आहे.
ठेकेदाराकडे २०१७ पासून सफाई कामगार कामे करत आहेत. मात्र ठेकेदार कामगार महिलांचे एटीएम, पासबुक स्वतःकडे ठेवून कमी वेतन देत आहेत. केवळ आठ हजार पगार कामगारांना दिला जात आहे. पूर्वी एका ठेकेदारावर कारवाई केल्यानंतर कामगारांच्या फरकाची रक्कम दिली होती. तसेच इतरही ठेकेदारांनी करावे.या व इतर मारण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे,
सफाई कामगारांनी वारंवार तक्रार करून देखील ठेकेदारांवर कोणतीच कारवाई होताना दिसत नाही. या बाबत त्वरित दखल घेऊन ठेकेदारांवर कारवाई करावी, या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.