न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ फेब्रु.) :- पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मेट्रोच्या कामाला सुरूवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात स्वारगेट ते पिंपरी चौकापर्यंत मेट्रो मंजूर करण्यात आली होती. ही मेट्रोसेवा निगडीपर्यत सुरु करण्याच्या मागणीला यश आले आहे.
सुरूवातीला पहिल्या टप्प्यात पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी ते पिंपरी ५.६ किलो मीटर अतंरावरील कामास मेट्रोकडून सुरूवात करण्यात आली होती. मेट्रो रेल ही सुविधा दापोडी ते निगडी (भक्ती शक्ती) पर्यंत व्हावी, अशी संपूर्ण शहरातील नागरिकांची व लोकप्रतिनिधींची इच्छा होती. पिंपरी ते निगडी हे अतंर ६ .८ किलो मीटर आहे. दापोडी ते निगडी हे संपूर्ण अंतर १२ कि.मी. आहे.
पुणे मेट्रोच्या या एकूण १२ कि. मी अंतरावरील दापोडी ते निगडीपर्यंतच्या कामास आज बुधवार (दि. २७) रोजी महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली आहे. आता चिंचवड, आकुर्डी व निगडी या एकूण तीन स्थानकांचा यात समावेश असणार आहे.
मेट्रोकडून सविस्तर प्रकल्प अहवाल सादर केल्यानंतर डिसेंबर २०१८ मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेने या प्रकल्पास मंजुरी दिली होती. त्यानंतर हा अहवाल राज्य शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. त्यास मान्यता मिळाली असून, आता राज्य शासनाने मेट्रोचा चेंडू अंतिम मान्यतेसाठी केंद्राच्या कोर्टात ढकलला आहे.










