न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ फेब्रु.) :- पिंपरी चिंचवड शहरात ६०० चौरस फुटापर्यंतच्या अनधिकृत बांधकामांना शास्तीकर पूर्वलक्षी प्रभावाने माफ करण्यात आले असून, एक हजार चौरस फुटांपर्यंतच्या अनधिकृत बांधकामांचा शास्तीकर पूर्णपणे माफ करण्यात यावा. त्याबाबत येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच सरकारने घोषणा करावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे अध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या या मागणीस यश आले आहे. आज बुधवार (दि. २७) रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक हजार चौरस फुटांपर्यंतच्या अनधिकृत बांधकामांचा शास्तीकर माफ करण्याचा महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत लाखांहून अधिक अनधिकृत बांधकामे आहेत. या सर्व अनधिकृत बांधकामांना २००८ पासून मूळ मालमत्ताकरावर दुप्पट शास्तीकर आकारला जात होता. तो रद्द व्हावा यासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांनी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला. परंतु, तत्कालिन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकार १५ वर्षे सत्तेत असताना प्रत्येकवेळी मागणी मान्य करण्याचे आश्वासन देऊन नागरिकांच्या तोंडाला केवळ पाने पुसण्याचे काम केले होते. त्यामुळे आमदार जगताप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर ऑगस्ट २०१७ मध्ये अनधिकृत बांधकामांना आकारण्यात येणाऱ्या शास्तीकराबाबत मोठा निर्णय घेण्यात आला.
६०० चौरस फुटापर्यंतच्या निवासी बांधकामांची शास्तीकरातून सुटका करण्यात आली. तसेच ६०० ते १००० चौरस फुटापर्यंतच्या निवासी बांधकामांना प्रतिवर्षी मालमत्ता कराच्या ५० टक्के शास्तीकर, तर १००१ चौरस फुटापुढील निवासी बांधकामांना पूर्वीप्रमाणेच मालमत्ता कराच्या दुप्पट दराने शास्तीकर आकारण्याचा कायदा केला. या निर्णयाने पिंपरी-चिंचवडमधील हजारो अनधिकृत बांधकाम धारकांना दिलासा मिळाला होता. परंतु, हा निर्णय नव्याने होणाऱ्या बांधकामांना लागू होणार असल्यामुळे जुन्या अनधिकृत बांधकामधारकांवर शास्तीकराची टांगती तलवार कायम होती. त्यामुळे शास्तीकर हा पूर्वलक्षी प्रभावाने माफ करावा. तसेच ६०० ऐवजी एक हजार चौरस फुटांपर्यंतच्या अनधिकृत बांधकामांचा शास्तीकर माफ व्हावा यासाठी आमदार जगताप यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणीचा रेटा लावला होता. त्याची दखल घेऊन ६०० चौरस फुटांपर्यंतच्या अनधिकृत बांधकामांचा शास्तीकर पूर्वलक्षी प्रभावाने माफ करण्याचा निर्णय घेतला गेला. परंतु, ६०० चौरस फुटांपर्यंतच्या अनधिकृत बांधकामांच्या कक्षेत पिंपरी-चिंचवडमधील फार कमी बांधकामे येत आहेत. त्यामुळे या निर्णयाचा कमी लोकांना फायदा पोचणार होता.
अनधिकृत बांधकामांना आकारण्यात येणाऱ्या शास्तीकरातून खरोखरच नागरिकांची सुटका होण्यासाठी ६०० चौरस फुटाची मर्यादा वाढवण्याची आवश्यकता होती. एक हजार चौरस फुटांपर्यंतच्या अनधिकृत बांधकामांना आकारला जाणारा शास्तीकर माफ केल्यास शहरातील हजारो लोकांना त्याचा फायदा होणार होणार असल्याने, त्याबाबत सरकारने धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यांच्या या पाठपुराव्याला अखेर यश आले असून, बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक हजार चौरस फुटांपर्यंतच्या अनधिकृत बांधकामांचा शास्तीकर माफ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.











