- ही आहेत गोवर आजाराची प्रमुख लक्षणं…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ नोव्हेंबर २०२२) :- मुंबईत गोवरच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे, असे माध्यमातून प्रसिद्ध झाले आहे. या पार्श्वभूमीवर गोवर या आजाराबाबत काही खबरदारी नागरिकांनी घेणे आवश्यक आहे.
गोवरची लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत… .
गोवर हा वेगाने पसरणारा आजार आहे. पॅरामिक्सो व्हायरसमुळे हा आजार होतो. हा विषाणू सर्वप्रथम श्वसनमार्गाला संक्रमित करतो.
अंगावर लाल पुरळ किंवा लाल रंगाचे रॅशेस येणं या आजाराची प्रमुख लक्षणं मानली जातात.
सुरुवातीला मुलांना खोकला आणि सर्दी ही लक्षणं दिसतात. तसंच डोळे लाल होऊ शकतात.
बालकांमध्ये अशक्तपणा जाणवतो.
प्रामुख्याने पाच वर्षाखालील बालकांमध्ये हा आजार आढळत असल्याने कुटुंबियांनी गोवरच्या लक्षणांवर लक्ष ठेवावं. मुलांना गोवरची लक्षणं असल्यास शाळेत आणि इतर कुठल्याही गर्दीच्या ठिकाणी पाठवू नये. तसंच गोवर हा वेगाने पसरणारा आजार असल्याने लहान मुलांमध्ये गोवरची लक्षणं दिसल्यास बालकास तातडीने नजिकच्या महापालिकेच्या रुग्णालय, दवाखान्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना दाखवावे. घरच्याघरी उपचार किंवा अंगावर काढू नये. कारण गोवर हा संसर्गजन्य आजार आहे.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये सद्यस्थितीत गोवर रुग्ण आढळले नाहीत. तथापि आपल्या घरातील लहान बालकांना गोवर आजार होऊ नये यासाठी ९ महिन्यांचे बालक आणि १६ महिन्यांच्या बालकांना गोवर-रुबेला प्रतिबंधक लस दिली जाते. कोणत्याही कारणास्तव पालकांनी ही लस मुलांना दिली नसेल तरी पाच वर्षापर्यंत मुलांना ही लस देता येते. हे लसीकरण विशेषतः दर गुरुवारी तसेच मनपा दवाखाना, रुग्णालयाने निश्चित केलेल्या ठिकाणी स. ९.३० ते ३.३० या कालावधीत मोफत उपलब्ध आहे. त्यामुळे लहान मुलांमध्ये लक्षणं नसली तरीही बालकांचे लसीकरण करून घ्यावे असे नागरिकांना आवाहन करण्यात
येत आहे.