- पालिकेकडून ठेकेदाराविरुद्ध पिंपरी पोलिसात फौजदारी दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ नोव्हेंबर २०२२) :- आकुर्डीमधील दत्तनगर व मोहननगर भागात मोठ्या झाडांची कत्तल केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी झाडांची कत्तल करणाऱ्या विरोधात पिंपरी चिंचवड महापालिकेने तक्रार देत फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.
आकुर्डीमधील दत्तनगर व मोहननगर भागामध्ये ठेकेदाराच्या काही कामगारांकडून २० ते २५ मोठी झाडे तोडण्यात येत असल्याचे आढळून आले. या कामगारांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून त्यांनी ही झाडे तोडली असल्याचे सांगितले. यावरून भाजपचे अमित गोरखे आणि पर्यावरण संस्थेच्या वतीने कारवाईची मागणी केली होती.
त्यानंतर खडबडून जाग आलेल्या उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला. त्यामध्ये फायकस १४, पेल्ठाफोरम ६ चिंच १ अशा २१ झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्या तर सुबाभूळ व वड अशा दोन झाडांची अवैधपणे वृक्षतोड करण्यात आली. याप्रकरणी इशार जफर शा (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) या खासगी ठेकेदाराविरुद्ध पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकुर्डीतील या भागात झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. तसेच संबंधित कर्मचाऱ्यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. झाडे तोडणारा ठेकेदार महापालिकेचा नसून तो खासगी ठेकेदार आहे.
-सुभाष इंगळे, उपायुक्त, उद्यान विभाग…