न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ नोव्हेंबर २०२२) :- पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या वतीने सन २०२३ २०२४ या आर्थिक वर्षांसाठी अंदाजपत्रक तयार करण्याचे कामकाज सुरू झाले आहे. त्यासाठी नागरिकांनी दहा लाखांपर्यंतची कामे सुचविण्याचे आवाहन महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.
महापालिकेच्या वतीने नव्या वर्षांचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सन २००७-०८ पासून अंदाजपत्रकात नागरिकांनी सुचविलेल्या कामांचा समावेश केला जातो. गरजेनुसार आवश्यक व योग्य कामांचा समावेश अंदाजपत्रकात करण्यात येतो. नागरिकांनी दहा लाख खर्चापर्यंतची कामे सुचवावीत.नागरिकांच्या सूचना अर्ज १५ डिसेंबर २०२२ सायंकाळी पाचपर्यंत संबंधित क्षेत्रीय कार्यालय किंवा ई-मेलवर स्वीकारण्यात येणार आहेत.
संबंधित क्षेत्रीय अधिकारी व कार्यकारी अभियंता हे सुचविलेल्या कामांची शहानिशा करून विकासकामांचा समावेश अंदाजपत्रकात करतील, याची नागरिकांनी नोंद घ्यावी. नागरिकांनी अंदाजपत्रकासाठी चांगल्या कामांची सूचना पाठवावी. तसेच नागरिकांनी सुचविलेली कामांची माहिती सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी अंदाजपत्रकात समावेशासाठी आयुक्तांकडे पाठवावी, असेही आयुक्त सिंह यांनी म्हटले आहे. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. नागरिकांनी कामाचे स्वरूप व स्थान अचूकपणे लिहावे. अर्ज भरण्याआधी क्षेत्रीय कार्यालय किंवा सारथी हेल्पलाईनवर (८८८८००६६६६) संपर्क साधावा.
ही कामे सुचविता येतील…
पदपथ, सायकल मार्ग, रस्ता डांबरीकरण, रस्ता दुभाजक, दुरुस्ती, बसस्थानक, माहितीफलक, नामफलक, बैठक व्यवस्था, रस्त्यावरील दिवे, वाहतूक दिवे, इमारत दुरुस्ती, सार्वजनिक वाचनालय, पाणीपुरवठा ड्रेनेज, स्मशानभूमी, विर्सजन घाट, आरोग्य निरीक्षक केबिन, शौचालय, मुतारी, कचराकुड्या अशी कामे नागरिकांना सुचविता येतील.















