न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ नोव्हेंबर २०२२) :- महापालिका शिक्षण विभागाने उशिरा पुरवठा आदेश दिल्याने दिवाळी सुटीनंतर पालिकेच्या विद्यार्थ्यांना गणवेश, पीटी गणवेश आणि स्वेटरचे वाटप सुरू केले. माध्यमिक व प्राथमिक शाळेत हे वाटप सुरू आहे. विद्यार्थ्यांना वेळेवर स्वेटर मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला.
महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी शालेय साहित्याचे वाटप केले जाते; मात्र महापालिकेच्या दफ्तर दिरंगाई धोरणामुळे विद्यार्थ्यांना शालेय साहित्यापासून वंचित राहावे लागले. न्यायालयाने महापालिकेला शाळा सुरू होण्यापूर्वी आदेश दिला. पूर्वीच्याच करारनामा व जुन्याच दराने संबंधित ठेकेदाराला पुरवठा आदेश द्यावा, असे म्हटले होते. त्या आदेशाकडे आयुक्तांनी दुर्लक्ष केले. संबंधित ठेकेदाराकडे गणवेश, पीटी गणवेश, स्वेटर तयार असताना पुरवठा आदेश दिला नाही.
जूनमध्ये शाळा सुरू झाल्यानंतर ही वेळेवर खरेदी प्रक्रिया, डीबीटी धोरणाची योग्य अंमलबजावणी करण्यात आली नाही. तत्कालीन आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांच्या निर्णयाअभावी गेली सहा महिने सर्व विद्यार्थी गणवेश, पीटी गणवेश, स्वेटरसह अन्य शालेय साहित्यापासून वंचित राहिले होते.
दरम्यान महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत सुमारे ४० ते ४५ हजार मुलं-मुली शिक्षण घेत आहेत. त्या विद्यार्थ्यांना गणवेश, पीटी गणवेश आणि स्वेटरचे वाटप अंतिम टप्प्यात आहे.
















