न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ नोव्हेंबर २०२२) :- भोसरीतील चक्रपाणी वसाहतीजवळ मोकळ्या मैदानात वापरलेले हजारो इंजेक्शनचे ढीग आढळले. महापालिका आरोग्य विभागाने या कचरा टाकणाऱ्या आस्थापनेचा शोध घेतला असून कारवाई केली आहे.
भोसरी येथील आळंदी रोडपासून चक्रपाणी वसाहत आणि पुढे मोकळ्या मैदानाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला वापरलेल्या इंजेक्शनचे तीन ढीग आढळले. त्यामध्ये हजारो इंजेक्शनसह रुग्णालय, दवाखान्यात वापरलेला व इतर वैद्यकीय कचरा होता. ही बाब निदर्शनास आल्यानंतर नागरिकांनी महापालिका आरोग्य विभागाला माहिती दिली. आरोग्य विभागाने तातडीने हे कचऱ्याचे ढीग उचलले. तसेच कचऱ्यातील कागद, इंजेक्शन औषधांच्या बाटल्या, सलाईन आणि औषधांच्या बाटल्यांवरून संबंधित वैद्यकीय आस्थापनेचा शोध घेतला.
यासंदर्भात महापालिकेचे आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे म्हणाले की, भोसरीतील चक्रपाणी वसाहतीपासून काही अंतरावर मोकळ्या जागेत इंजेक्शन व वैद्यकीय साहित्य आढळून आले. आरोग्य कर्मचाऱ्यांनी तातडीने हा वैद्यकीय कचरा उचलला असून बेकायदेशीरपणे मेडिकल वेस्ट टाकणाऱ्या आस्थापनेचा शोध घेतला. यामध्ये धावडे वस्ती येथील डॉ. दत्तात्रय घावटे यांच्या आनंद क्लिनिकमधील हा कचरा असल्याचे समोर आले असून त्यांच्यावर ३५ हजार रुपये दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच ५ हजार रुपये प्लास्टिक वापरासंबंधी दंड आकारला आहे.
















