न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ नोव्हेंबर २०२२) :- गप्पा मारण्याच्या बहाण्याने फिर्यादीच्या ओळखीचा इसम महिलेच्या घरी आला. महिलेच्या हातातली सोन्याची बांगडी बघुन, ही बांगडी सोन्याची आहे काय? असे बोलत आरोपीने फिर्यादीकडे हातातली बांगडी पाहण्यासाठी मागितली. फिर्यादीने हातातली बांगडी काढून आरोपीला पाहण्यासाठी दिली. तेवढ्यात आरोपीने फिर्यादीकडे पिण्यासाठी पाणी मागितले. फिर्यादी पाणी आणण्यासाठी घरात गेल्या असता आरोपीने फिर्यादीची सोन्याची बांगडी घेवुन तिथून पलायन केले. फिर्यादी पाणी घेऊन आल्या असता आरोपी तिथे त्यांना दिसला नाही.
फिर्यादीने आरोपीला फोन केला तेव्हा पाच मिनीटात परत येतो, असे सांगून तो परत आलाच नाही. फिर्यादी आरोपीच्या राहत्या घरी तळेगाव दाभाडे इथे त्याला शोधण्यासाठी गेल्या असता आरोपी तिथेही त्यांना सापडला नाही. आरोपीने फिर्यादीच्या १,३२,००० रुपयांच्या सोन्याच्या बांगडीचा अपहार केल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार सोमवारी (दि. १४) रोजी दुपारी ३. ०० वाजण्याच्या सुमारास घर नं. २३३, म्हातोबानगर दत्त मंदिर रोड, वाकड येथील राहत्या घरी घडला. महिला फिर्यादी यांनी आरोपी गणेश घुले (वय ३५ वर्ष अंदाजे, रा. शिवाजी चौक, तळेगाव दाभाडे) याच्या विरोधात वाकड पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.