- यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सचा उपक्रम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ नोव्हेंबर २०२२) :- यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) च्या एमबीए व एमसीए विद्याशाखेतील प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांच्या ‘यशोप्रवेश’ या इंडक्शन सोहळ्याला चिंचवड येथे उत्साहात सुरुवात झाली. उद्घाटन सत्रात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी विद्यार्थ्यांना विविध उदाहरणांचा दाखला देत मार्गदर्शन करताना सांगितले की, आपण सतत जागरूक व सकारात्मक विचारसरणी अंगीकारून चौकटीबाहेरचा विचार करण्याची क्षमता तसेच तणावपूर्ण परिस्थितीतसुद्धा योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित करायला हवी.
तर मायलिन झेनवर्क्स सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडचे सह संस्थापक सुरेंद्र ब्रम्हे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी क्रमिक अभ्यासक्रमाबरोबर उद्योगजगताच्या अपेक्षा लक्षात घेऊन स्वतःमध्ये आवश्यक ते कौशल्य विविध ऑनलाईन अभ्यासक्रमाद्वारे विकसित करावे असे सांगितले. याशिवाय माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे स्वरूप व त्यामधील कामकाज पद्धती याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
तसेच टीसीएस कंपनीचे डिलिव्हरी पार्टनर दिनेश कोठावडे यांनी त्यांच्या मनोगतातून एमबीए व एमसीए विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध रोजगारसंधींबाबत मार्गदर्शन करीत प्रत्येकाने स्वतःच्या रेझ्युमीमध्ये नावीन्यपूर्ण वेगळेपण कसे येईल याबाबत विचार करून ते अंमलात आणावे असे आवाहन केले.
इंडक्शन सोहळ्याच्या दुसऱ्या सत्रात किशोर पंप्सच्या संचालिका अमृता देसाई यांनी त्यांच्या मनोगतात उद्योगजगताला योग्य उमेदवार मिळण्यामध्ये कोणकोणत्या अडचणी येतात याबद्दल माहिती दिली. तसेच दिलेले काम निर्धारित मुदतीत पूर्ण करणे, वक्तशीरपणा, सकारात्मक दृष्टीकोन, स्वयंप्रेरित व्यक्तिमत्व आणि सहकार्य अनुकूल संवाद या उद्योगक्षेत्राच्या अपेक्षांबद्दल त्यांनी सविस्तर विवेचन केले.
सिमेन्स टेक्नॉलॉजी अँड सर्व्हिसेसचे सहाय्यक उपाध्यक्ष, हेमंत मिसाळ यांनी त्यांच्या मनोगतात माहिती तंत्रज्ञान उद्योगाच्या प्रगतीचा आढावा घेत भारतीय आय. टी. उद्योगात आपण कसे अधिकाधिक योगदान देऊ शकतो याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तर टेक महिंद्राचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रसाद देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, डेटा सायंटिस्ट, मशीन लर्निंग डिझाईन, क्लाउड इंजिनिअर, सिक्युरिटी इंजिनिअर अशा माहिती तंत्रज्ञान उद्योगक्षेत्रात नव्याने निर्माण होत असलेल्या संधींबद्दल सविस्तर विवेचन केले.
तसेच डेल्फी कॉम्प्युटेक प्रा. लि. चे प्रकाश वासेकर यांनी त्यांच्या मनोगतातून विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट जगतातील योग्य कम्युनिकेशन पद्धतींबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. याशिवाय कॉर्पोरेट जगातील कामाच्या ताणतणावाचे कसे व्यवस्थापन करावयाचे याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.
‘यशोप्रवेश’ सोहळ्याचे प्रास्ताविक करताना आयआयएमएस चे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांबद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ‘यशस्वी’ संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांनी एमबीए विद्यार्थ्यांकडे विविध समस्यांकडे पाहण्याचा चिकित्सक व विश्लेषणात्मक दृष्टीकोन असायला हवा असे सांगत विद्यार्थ्यानी केवळ नोकरीचा पर्याय स्वीकारण्याऐवजी उद्योजकतेचा पर्याय स्वीकारावा असे आवाहन करीत यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य संस्थेतर्फे करण्यात येईल असे सांगितले.
या इंडक्शन सोहळ्याचे सुत्रसंचालन रविना लोढा व हर्षदा नलावडे या विद्यार्थिनींनी केले.