- गोवर आजाराबाबत डॉक्टरांनी जनजागृती करणे गरजेचे – दिनेश यादव..
- कुदळवाडीत गोवरच्या उपाययोजनां संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ नोव्हेंबर २०२२) :- मुंबईत मागील काही दिवसांपासून गोवर या आजाराचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर चिखली-कुदळवाडीसह शहरात गोवरच्या संशियत रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.
याबाबत स्वी नगरसेवक दिनेश यादव यांच्या पुढाकाराने कुदळवाडीतील जनसंपर्क कार्यालयात परिसरातील डॉक्टरांसाठी गोवर आजाराच्या उपाय योजनांसाठी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, आकुर्डी रुग्णालयाचे जेष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब होडगर, स्वी. नगरसेवक दिनेश यादव, डॉ. राहुल साळुंखे, कुदळवाडीतील डॉक्टर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. पवन साळवे म्हणाले, सध्या हवामानात मोठ्या प्रमाणावर बदल झाला आहे. हवेमध्ये वाढ झालेल्या उष्णतेमुळे हा संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता अधिक आहे. तसेच संसर्गजन्य आजारांमध्ये गोवर हा आजार प्रथम क्रमांकावर येत असून अस्वच्छतेमुळे झोपडपट्ट्यांमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक दिसून येत आहे. तसेच सर्दी, खोकला झालेले असताना जर मुलं बाहेर खेळण्यास गेले आणि इतर मुलांमध्ये जाऊन ते शिंकले किंवा खोकले तर संसर्ग अधिक लवकर पसरतो, कारण या आजाराचे जंतू हे हवेत साधारण २ तास असतात. डॉक्टरांनी मुलांसाठी स्वतंत्र ओपीडी सुरू करावी. सर्व्हेक्षण करुन संशयित लक्षणं असणाऱ्या मुलांवर लक्ष ठेऊन पालिकेच्या आरोग्य विभागाला कळवावे, अशा सूचना डॉ. साळवे यांनी बैठकीत उपस्थित डॉक्टरांना केल्या.
लसीचा पहिला डोस नऊ महिने पूर्ण ते १२ महिने व दुसरा डोस १६ ते २४ महिने या वयोगटात देण्यात येतो. वेळापत्रकाप्रमाणे लसीकरण केल्यास गोवर रोग टाळता येतो, असे डॉ. होडगर यांनी सांगितले.
दिनेश यादव म्हणाले, मुंबईतील गोवर उद्रेकाची स्थिती पाहता या रोगाची लक्षणे आढळल्यास रुग्णांनी घाबरून न जाता जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क करावा व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, यासाठी डॉक्टरांनी जनजागृती करावी.
लक्षणे…
ताप येणे, शरीरावर लाल पुरळ येणे, डोळे लाल होणे, गोव्याची लक्षणे आहेत. गोवरच्या विषाणूंनी शरीरात प्रवेश केल्यानंतर सात ते दहा दिवसांनी लक्षणे दिसण्यास सुरुवात होतात. सुरुवातीस ताप व खोकला, सर्दी, डोळे लाल होणे यापैकी एक-दोन किंवा तीनही लक्षणे असू शकतात. दोन-चार दिवसानंतर सर्व अंगावर पुरळ येणे, ते कानाच्या मागे, चेहरा, छाती, पोटावर पसरतात.