न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ नोव्हेंबर २०२२) :- मोहननगर येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संस्थेच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त पिंपरी येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास संस्थेचे संस्थापक कार्यवाह, ॲड. दिलीप निंबारकर आणि प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जयश्री निंबारकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आणि त्यांच्यासमोर ५१ ज्योतींचे दिवे प्रज्वलित करून आदरांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी विद्यालयाचे ढोल पथकही यामध्ये सहभागी झाले होते. महात्मा फुले यांचा पोवाडा सादरकर्ते शाहीर राजेंद्र कांबळे यांच्या हस्ते महात्मा फुले जीवन चरित्र खंड एक हे पुस्तक संस्थापक कार्यवाहक ॲड. निंबारकर सर यांना भेट देण्यात आले. त्याचबरोबर उपस्थित शिक्षक धनंजय जगताप सर, गणेश वाळुंज सर, श्रीमती आशा गायकवाड, विठा कोळेकर या सर्व शिक्षकांना तसेच उपस्थित ३२ विद्यार्थींना महात्मा फुले यांचे चरित्र पुस्तक भेट देण्यात आले. कार्यक्रमाच्या वेळी बहुजन समाज पार्टी भोसरी विधानसभा प्रभारी आयु बलराज कटके, पिंपरी चिंचवड मधील अनेक मान्यवर तसेच नागरिक उपस्थित होते.
गणेश वाळुंज यांनी महात्मा फुले यांच्या जीवन कार्याला उजाळा दिला, तर धनंजय जगताप यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संस्थेचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका जयश्री निंबारकर यांनी केले.