- पांडाभाऊ साने यांची पालिकेच्या पशू वैद्यकीय विभागाकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० नोव्हेंबर २०२२) :- पिंपरी-चिंचवड शहरात तसेच चिखली परिसरात आणि मोरेवस्ती भागात मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. तरी या मोकाट कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकतें पांडुरंग साने यांनी महापालिकेच्या पशू वैद्यकीय विभागाकडे केली आहे.
महापालिकेच्या पशू वैद्यकीय विभागाचे उपायुक्त अरुण दगडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील काही महिन्यांपासून मोरेवस्ती, म्हेत्रेवाडी, अष्टविनायक चौक, झेंडा चौक परिसरातील रस्त्यांवर मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे या परिसरातील नगारिकांना रस्त्याने ये-जा करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. तसेच सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्याच्या अंगावर कुत्री धावून जात आहेत. तर काही दुचाकी व चार चाकी वाहनांच्या मागे देखील कुत्री धावत आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
यापूर्वी देखील पशू वैद्यकीय विभागाला निवेदनाद्वारे कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. परंतु अद्याप या परिसरात आपल्या पथकाकडून कारवाई झालेली नाही. त्यामुळे मोरेवस्ती परिसरातील नागरिकांचे जीवन सोयीस्कर होण्यासाठी कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी साने यांनी केली आहे.