- अधिकाऱ्यांना समज द्या अन्यथा आंदोलन; शिवसेनेचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ डिसेंबर २०२२) :- चिखली कर संकलन विभागाचे अधिकारी व कर्मचारी हे कर भरणाकरिता नागरिकांना अरेरावी करीत आहेत. त्यांचे काहीच ऐकून न घेता नागरिकांना वेठीस धरून वसुली करण्याचा प्रयत्न करीत आहेत. नळ कनेक्शन तोडण्याची धमकी देत आहेत.
चिखली कर संकलन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना या प्रकरणी समज द्यावी; अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भोसरी विधानसभेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
नागरिकांना कर भरणा करण्यासाठी टप्पे करून देण्यात यावेत, कर संकलन कार्यालय प्रवेशद्वारावर करदात्या नागरिकांशी आदराने वागावे अशा आशयाचे फलक लावण्यात यावे, असेही निवेदनात म्हटले आहे.
पालिकेच्या कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भोसरी विधानसभा उपविभागप्रमुख प्रविण पाटील, शिवसेना संघटक रावसाहेब थोरात, विभागप्रमुख सतिश मरळ, प्रभाग समन्वयक सूर्यकांत देशमुख, उपविभागप्रमुख दादा ठाकरे, शाखाप्रमुख विजय शिवपुजे, सुमंत तांबे, विशाल जाधव, भालदार आदि उपस्थित होते.