- आयुक्तांकडून सावित्री महिला स्वयंरोजगार संस्था काळ्या यादीत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ डिसेंबर २०२२) :- पिंपरी-चिंचवड महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना शासन अनुदानातून शालेय पोषण आहार पुरवला जातो. या पोषण आहारात दिल्या जाणाऱ्या खिचडीत काचा, प्लास्टिकचे तुकडे आणि अळ्या आढळल्या होत्या. महापालिकेतील तेरा शाळांमध्ये शालेय पोषण आहार पुरवणाऱ्या मे सावित्री महिला स्वयंरोजगार या संस्थेवर कारवाई करण्यात आली असून, संस्थेला काळ्या यादीत टाकले आहे.
महापालिका शाळांमधील सुमारे ४० हजार विद्यार्थ्यांना शासकीय अनुदानातून शालेय पोषण आहार पुरविला जातो. महापालिका शिक्षण विभागाने एकूण २१ खासगी संस्थांना हा शालेय पोषण आहार पुरविण्याचे काम दिले आहे. शाळांच्या मुख्याध्यापकांनी केलेल्या तक्रारींमुळे सावित्री महिला स्वयंरोजगार नावाच्या संस्थेकडून पुरविलेल्या भातात चक्क केस, अळ्यांसह काचेचा, प्लास्टिकचा तुकडा आढळून आल्याची गंभीर बाब सावित्री महिला स्वयंरोजगार नावाच्या समोर आली होती. याबाबत शाळेतील मुख्याध्यापकांनी शिक्षण विभागाकडे तक्रार केली असतानाही ठेकेदारावर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात होती
मे. सावित्री महिला स्वयंरोजगार या संस्थेबाबत मुख्याध्यापकांनी वारंवार तक्रारी केल्या आहेत. त्याबाबत शिक्षण विभागाने संबंधित संस्थेला वारंवार नोटीस देऊनही संस्थेने समाधानकारक खुलासा केला नाही. तसेच पोषण आहारामध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा केली नाही. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून मे. सावित्री महिला स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेस पोषण आहार पुरवण्याचे काम काढून घेण्यात येत आहे. ते काम मे. अन्नामृत फाउंडेशन या संस्थेस देण्यास आयुक्त सिंह यांनी मान्यता दिली आहे.