न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ डिसेंबर २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी झालेली नियुक्ती रद्द करून अन्यायकारक वागणूक दिल्याने महापालिकेतील उपायुक्त स्मिता झगडे यांनी महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण मुंबई (मॅट) मध्ये दाद मागितली होती. थेट राज्य शासन आणि महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या विरोधात गेल्याने उपायुक्त स्मिता झगडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांना आयुक्त शेखर सिंह यांनी नोटीस बजावली आहे.
झगडे यांनी अन्यायकारकपणे नियुक्ती रद्द झाल्यामुळे थेट ‘मॅट’मध्ये दाद मागितली. त्यामध्ये राज्य शासन, पिंपरी चिंचवड महापालिका आणि प्रदीप जांभळे यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. या नोटिसीवर खुलासा देण्यास सुरुवातीला फक्त ४८ तास वेळ देण्यात आला होता. त्यानंतर स्मिता झगडे यांनी मुदतवाढ मागितल्याने त्यांना खुलासा सादर करण्यासाठी दहा दिवसांचा कालावधी दिलेला आहे.
त्यावर सुनावणी सुरू असताना झगडे व अतिरिक्त आयुक्त जांभळे यांच्यातील नवा वाद समोर आला आहे. जांभळे यांनी बैठकांना गैरहजर राहणे व काही प्रस्ताव प्रलंबित ठेवण्यावरून एक अहवाल सादर केला. त्यावरून आयुक्त सिंह यांनी झगडे यांना हलगर्जीपणा, निष्काळजीपणा व सेवा नियमांचा भंग करणारे वर्तन केल्याबद्दल नोटीस बजावली आहे.