न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ डिसेंबर २०२२) :- धारधार शस्त्राने डोक्यात वार करून आठ ते दहा जणांच्या टोळक्याने एका सराईताचा खून केला. ही घटना मोहननगर, चिंचवड येथे शुक्रवारी (दि. २) सायंकाळी घडली. विशाल गायकवाड (२९, रा. म्हेत्रेवस्ती, चिखली), असे खून झालेल्या सराईताचे नाव आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल सायंकाळी मोहननगर येथील एका चौकात थांबला होता. त्यावेळी अचानक आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला चढवला. आरोपींनी विशाल याला जमिनीवर पाडून त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी विशाल रक्ताच्या थारोळ्यात होता.
मयत विशाल हा सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावर खून, मारामारी, लूटमार, दरोडा यासारखे तब्बल १२ गंभीर गुन्हे दाखल होते. त्याच्यावर सन २०१७ मध्ये मोका अन्वयेदेखील कारवाई करण्यात आली होती.
त्याला तत्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. पोलिसांना घटनस्थळावर पिस्तुलाच्या रिकाम्या पुंगळ्या मिळून आल्या आहेत. पोलिसांनी आरोपींचा माग काढण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.