आकुर्डीतील प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयात मराठी गौरव दिन साजरा
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
आकुर्डी (दि. २ मार्च) :- कोणत्याही लोकभाषेला किंवा लोकांच्या मातृभाषेला राजसत्तेचे पाठबळ असेल तरच ती अधिक विकसित होते आणि दीर्घकाळ टिकून राहते. महाराष्ट्राच्या मातीमध्ये आणि मराठी माणसांच्या मनामध्ये मराठी भाषा रुजविण्याची आणि टिकविण्याची कामगिरी सर्व मराठी संतांनी केली. त्याशिवाय सर्व प्रकारच्या लोककलावंतांचेही मोठे योगदान आहे. छत्रपती शिवरायांनी स्वराज्यामध्ये मराठीला राजभाषेचा सन्मान दिला, मराठीसाठी नवीन शब्द दिले. राजभाषा व्यवहार कोश तयार करविला.
आकुर्डी येथील प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयात मराठी गौरव दिनानिमित्त विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना कामगार नेते अरुण बोऱ्हाडे यांनी प्रतिपादन केले. यावेळी उल्का महाजन, धनाजी गुरव, अभय शुक्ला, मुक्ता श्रीवास्तव, डॉ. गणेश देवी, अनंत फडके, अविनाश कदम, प्रियदर्शी तेलंग, शिराज प्रभू, सुभाष लोमटे, शुभा शमीम, कुमार शिराळकर, सीमा कुलकर्णी, अजित नवले, चंदन कुमार, विश्वास उटगी, रवी दुग्गल, शंकर पुजारी, मेधा थत्ते, एम.ए. पाटील, सुजाता गोठोसकर, ब्रायन लोबो, चंद्रकांत यादव, मयुरेश भडसावळे, हनुमंत ताठे, विलास भोंगाडे, हसीना खान, मारुती भापकर, जोस अंतोनी जोसेफ, बिलाल खान, सीताराम शेलार, बी. जी. पाटील, श्वेता दामले, बिलाल खान आदी उपस्थित होते.
अरुण बोऱ्हाडे पुढे बोलताना म्हणाले की, दिनांक १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर मराठीला राजभाषा म्हणून स्विकारण्यात आले. महाराष्ट्राचे शिल्पकार कै. यशवंतराव चव्हाण यांनी मराठीच्या उत्कर्षासाठी भरीव कामगिरी केली. मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाची स्थापना केली. नामवंत तज्ञांकरवी मराठीतील प्रत्येक शब्दाची उकल करणारी अभ्यासपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्यात आली. हजारो पानांचे १८-१९ खंड प्रकाशित झालेत. हे कार्य आजही चालू आहे. त्याशिवाय भाषा संचालनालय, साहित्य व संस्कृती मंडळ, इतिहास संशोधन मंडळ, नवीन लेखकांना अनुदान, मराठी चित्रपटांना अनुदान, लोक कलावंतांना प्रोत्साहन इत्यादी उपक्रम सुरू केले. राजसत्तेच्या या प्रयत्नांना जनतेने पाठबळ दिले तरच मराठीचा उत्कर्ष होईल. किमान ज्यांची मातृभाषा आहे, त्यांनी तरी ही काळजी घ्यायला हवी. ज्ञानभाषा म्हणून इंग्रजी व अन्य भाषा अवगत असाव्यात, त्याबाबत दुमत नाही. पण मातृभाषेला संपूर्णतः पाठ दाखवून कसे चालेल. भाषा म्हणजे केवळ बोली नव्हे, तिच्याशी आपली संस्कृती, परंपरा इत्यादी निगडीत आहेत. नाट्य, कला, काव्य, साहित्य, लोककला, लोकगीते, लोकसंस्कृती इत्यादी खूप मोठे दालन आपल्या मराठी भाषेचे आहे. आपली भाषा आणि संस्कृती टिकवून विकसित करणे ही प्रत्येक मराठी व्यक्तीची जबाबदारी आहे.
दिवसेंदिवस आपण सर्व मराठी लोक झपाटयाने बदलत चाललो आहोत. आमची ग्रंथालये ओस पडलीत. मराठी शाळा बंद पडू लागल्या आहेत. मराठी नाटकांचा प्रेक्षक कमी झालाय. “सीबीएसई ” किंवा “इंटरनॅशनल स्कूल” हे शब्द आता परवलीचे होऊ लागलेत. तिथेच मराठी भाषा आणि संस्कृतीच्या भवितव्याची चिंता वाढली आहे. रोजच्या व्यवहारातील मराठी शब्द वापरायला मन कुचराई करतेय. आई-आबा-बाबा कधीच दूर गेलेत, मॉम-डॉड मानगुटी बसलेत. आजोबांचा ग्रँड-फा तर, बंधूचा ब्रो झालाय… अशा असंख्य इंग्लिश शब्दांचा नाहक बोजा जिभेवर नाचवत आपण वावरत असतो. सहज विचार केला तर लक्षात येईल की खरंच यातील अनेक गोष्टी टाळता येतील आपल्याला. आधुनिकतेचा गोडवा गाताना, मातृभाषेचे माधुर्य आणि सौदंर्य विसरू नये एवढीच अपेक्षा आहे, असे बोऱ्हाडे यांनी यावेळी बोलताना आपले मनोगत व्यक्त केले.











