न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ डिसेंबर २०२२) :- महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केलं आहे. त्यांचा निषेध करण्याकरिता गुरुवारी (दि. ८) रोजी पिंपरी चिंचवड शहर सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद करण्यात येणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून विशिष्ट व धर्मांध विचारसरणीच्या नेत्यांकडून बहुजन महापुरुषांच्या बाबतीत अवमानकारक वक्तव्ये व लिखाण करून बहुजनांच्या स्वाभिमानावर व अस्मितेवर वारंवार हल्ले करण्यात येत आहेत. दोन तीन महिन्यांपूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अतिशय हिन व गलिच्छ शब्दात त्यांची टिंगल केली होती. त्यानंतरही त्यांनी “शिवाजीचा काळ आता जुना झाला” असे म्हणत बहुजनांच्या सन्मानाला पायदळी तुडवले. याचा निषेध करण्याऐवजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या मंत्र्यांना पाठीशी घालण्याचे काम करीत आहेत.
या बंदमध्ये शहरातील नागरिक, व्यापारी, उद्योजक कामगार, कष्टकरी वर्गाने यामध्ये सक्रियपणे सहभागी व्हावे, असे आवाहन सर्व पुरोगामी राजकीय पक्ष व संघटनांच्या वतीने पिंपरी चिंचवड बहुजन महापुरुष सन्मान समितीने केले आहे.


















