न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ डिसेंबर २०२२) :- बांधकाम व्यावसायिक सुखवानी असोसिएट्सने थेरगावातील सर्वे नं २७, बारणे एम्पायर, क्रांतिवीरनगर येथे Sukhwani Kingsley या व्यावसायिक इमारतीचे बांधकाम सुरु केले आहे. त्यासाठी जिवंत नैसर्गिक नाला बुजवला आहे. या बांधकामाला महापालिकेच्या पर्यावरण विभागाचा ना हरकत दाखलादेखील प्राप्त झाला.
नैसर्गिक नाला बंदिस्त करणे हे पर्यावरणाच्या दृष्टीने घातक आहे. कायदेशीर मान्यता नसताना महापालिकेने डोळेझाक करून या प्रकल्पाला ना हरकत दाखला देणे चुकीचे आहे. भविष्यात पिंपरी चिंचवड शहराला पूर परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते. या व्यवसायिकाने बांधकामापासून ३०० मीटर अंतरावर नाल्यालगत अनधिकृतपणे भिंत उभारली आहे.
याबाबत पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही. हे बांधकाम तातडीने थांबवण्यात यावे. बुजवण्यात आलेला नाला पुन्हा खुला करावा. पर्यावरण ना हरकत दाखला रद्द करावा. अनाधिकृत सीमा भिंत पाडावी, अशी मागणी वृक्ष प्राधिकरण समितीचे माजी सदस्य अजिंक्य बारणे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


















