- ड्रोन सर्वेक्षण प्रणालीद्वारे बांधावरची माहितीही एका क्लिकवर उपलब्ध …
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ डिसेंबर २०२२) :- शहरीभाग जरी दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असला तरी ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात भौगोलिक बदल होत आहेत. गावाची वाढती लोकसंख्या विकासाच्या विविध योजना असे बदल होत असताना ग्रामीण भागातही जमीन हस्तांतरणाची प्रक्रियादेखील वेगाने सुरू आहे. परंतु, ग्रामीण भागात गावठाणांचे अभिलेख नसल्याने नेमकी जागा किती आहे व कोणाची याबाबत अनेक वादविवाद होत असतात. यासाठी केंद्र पुरस्कृत स्वामित्व योजनेंतर्गत महाराष्ट्र शासनाने राज्यातील प्रत्येक गावातील गावठाणातील जमिनीची मोजणी ड्रोन प्रणालीद्वारे जीआयएस सिस्टमने करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक गावच्या ग्रामपंचायत हद्दीतील मालमत्तेचे प्रॉपटी रेकॉर्ड कार्ड तयार करण्यात येत आहे.
केंद्र पुरस्कृत स्वामित्व योजनेअंतर्गत ग्रामविकास विभाग, भूमि अभिलेख विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नातून राबविण्यात येत असून, पुणे जिल्ह्यात १ हजार ४०० गावठाणांची मोजणी ड्रोनद्वारे करण्याचा निर्णय आहे. तालुक्यातील १९५ गावठाणातील २३ गावांच्या सर्वेक्षणाचे काम झाले आहे. ड्रोनद्वारे मोजणी सुरु आहे. जानेवारी अखेरपर्यंत काम पूर्ण होणार आहे.
गावठाणातील ड्रोनद्वारे मोजणी झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या खुल्या जागा, नाले यांच्या सीमा निश्चित होऊन अतिक्रमण रोखता येईल. ग्रामपंचायत हद्दीतील मालमत्तेचे प्रॉपटी रेकॉर्ड कार्ड तयार करण्यात येणार असल्यामुळे ग्रामपंचायतीला फायदेशीर होणार आहे. जागेवरून होणारे वादविवाद तंटे मिटण्यास नक्की मदत होईल, तसेच ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढण्यासदेखील मदत होणार आहे.
योजनेअंतर्गत ड्रोन सर्व्हेसाठी टप्पे पाहून प्रत्येक तालुकानिहाय गावांमध्ये ड्रोन फिरवून सर्व्हे करण्याचे काम पूर्ण केले जात आहे. एका गावांमध्ये पंधरा ते वीस मिनिटांत ड्रोनद्वारे सर्व्हे करण्याचे काम पूर्ण होते. त्यामुळे संपूर्ण गावातील घरे, मालमत्ता यांचे चित्र पूर्ण होणार आहे. हे चित्र संगणकावर जोडून त्या गावांचे नकाशे अद्ययावत करण्यात येत आहेत. त्यानंतर योजनेअंतर्गत जमिनीचे जे मालक आहेत त्यांना ई-प्रॉपर्टी कॉर्ड मिळणार आहे.
ड्रोनद्वारे मोजणीचे फायदे
■ विविध विकासयंत्रणा व विभागांना मोजणीचे नियोजन करताना सुलभता
■ पारंपरिक मोजणी पद्धतीपेक्षा ड्रोनद्वारे मोजणी कमी वेळेत
■ खर्चातही जवळपास ५० टक्के बचत होऊ शकते
■ मोजणी झालेल्या गावांतील नागरिकांना प्रॉपटी कार्ड मिळणार
■ जागेचा वाद मिटण्यास मदत होणार
■ ड्रोनद्वारे मोजणी कामात पारदर्शकता व अचूकता येते.
■ कमी मनुष्यबळाचा वापर
■ ३ डी इमेज प्राप्त’ होणार
गावठाणातील प्रत्येक मिळकतीच्या मालकी हक्काचे अभिलेख मालमत्ता पत्रक तयार होणार आहे. याचा नागरिकांना फायदा होणार आहे. ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार होत आहेत. मात्र, व्यक्तीच्या मालमत्तेची सीमारेषा माहिती नसल्याने अथवा गावठाणाचा सर्व्हे नकाशा उतारा उपलब्ध नसल्याने नेमकी किती जागा याबाबत स्पष्टता नसते. त्यामुळे अनेक अडचणी येतात. तसेच या सर्व्हेमुळे सरकारी मालमत्तेचे संरक्षण होणार असून, ग्रामपंचायतीच्या उत्पन्न करात भर पडू शकते.
– उर्मिला गलांडे, उपअधीक्षक, भूमी अभिलेख विभाग, मावळ…















