न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ डिसेंबर २०२२) :- काळेवाडी येथील श्रीमती लक्ष्मीबाई तापकीर माध्यमिक विद्यालय आणि एलबीटी इंग्लिश मीडियम स्कूल या दोन्ही विद्यालयांच्या वतीने क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
कै. श्रीमती लक्ष्मीबाई भाऊसाहेब तापकीर यांच्या तेराव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त या शाळेमध्ये दरवर्षी क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. हा महोत्सव १२ डिसेंबर ते १४ डिसेंबर दरम्यान घेण्यात आला. यानिमित्त धावणे, कबड्डी, खो-खो, लंगडी, लिंबू चमचा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. इंग्रजी व मराठी अशा दोन्ही विद्यालयातील पहिली ते दहावी इयत्तेमधील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. बुधवार दिनांक १४ डिसेंबरला या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला.
या समारंभासाठी राजाराम तापकीर, मोहन तापकीर, राजेंद्र पवार, माजी नगरसेविका अनिता तापकीर, युवा नेते सागर तापकीर, मुख्याध्यापक शशिकांत वाखारे, मुख्याध्यापिका कोमल सातपुते उपस्थित होते. संस्थेच्या वतीने मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक आणि सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाप्पू बल्लाळ यांनी तर आभार प्रदर्शन शशिकांत रसाळ यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता दोन्ही विद्यालयांच्या शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.