- माजी नगरसेविका विनया तापकीर यांचा प्रशासनाला सवाल..
- संत ज्ञानेश्वर महाराज जलतरण तलाव खुला करण्यासाठी आंदोलन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ डिसेंबर २०२२) :- चऱ्होलीतील वडमुखवाडी येथील सर्व्हे नं. १३१ येथे काही कोटी रुपये खर्चून पिंपरी चिंचवड महापालिकेने श्री संत ज्ञानेश्वर महाराज जलतरण तलावाची उभारणी केली आहे. परंतु, गेल्या नऊ महिन्यांपासून हा तलाव बंद आहे. तो महापालिकेने तात्काळ खुला करावा, अशी मागणी माजी नगरसेविका विनया तापकीर यांनी केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक महिलांनी आक्रमक होत, प्रशासनाचा धिक्कार करीत, ” जलतरण तलाव चालू करा; नाहीतर खुर्च्या खाली करा ” अशा घोषणा देत थेट जलतरण तलावावर हल्लाबोल करीत आज आंदोलन केले.
चऱ्होली-वडमुखवाडीतील श्री. संत ज्ञानेश्वर महाराज जलतरण तलाव हा नव्याने बांधण्यात आलेला आहे. या तलावाची पाणी साठवण क्षमता ७ लाख ११ हजार २८० लिटर इतकी आहे. सुमीत स्पोर्टस या ठेकेदाराला तलावाची साफसफाई, देखभाल-दुरूस्तीचे कामकाज देण्यात आले आहे.
विनया तापकीर म्हणाल्या, पिंपरी चिंचवड शहराला क्रीडानगरी म्हणून लौकिक मिळवून देण्याच्या दृष्टीने तसेच शहरातील खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात मोठी कामगिरी करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही लोकप्रतिनिधी प्रयत्नशील आहोत. जलतरणपटूंना दर्जेदार प्रशिक्षण घेण्यासाठी तसेच सराव करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहराबाहेर जावे लागत होते. ही सोय याच भागात उपलब्ध व्हावी यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला. चऱ्होली येथील सर्व्हे नं. १३१ वडमुखवाडी येथे जलतरण तलावाचे आरक्षण होते. हे आरक्षण विकसित करण्यासाठी २०१२ पासून मी पाठपुरावा करत होते. जागा ताब्यात घेत, त्यानंतर जलतरण तलावाचे आरक्षण विकसित करण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. या पंचवार्षिकमध्ये हे काम सर्वार्थाने पूर्ण झाले. ६२ गुंठे क्षेत्रात १६ बाय २५ आकाराचा जलतरण तलाव उभारण्यात आला आहे. ऑलिम्पिकच्या धर्तीवर हा सेमी ऑलिम्पिक जलतरण तलाव तयार करण्यात आला आहे. अत्यंत आकर्षक जलतरण तलाव नागरिकांच्या सेवेसाठी समर्पित करण्यात आला. मात्र पालिकेच्या कारभारामुळे गेल्या नऊ महिन्यांपासून हा जलतरण तलाव बंद आहे. या तलावाच्या देखभाल दुरुस्तीसाठी दरमहा ९७,०२० रुपये खर्च मंजूर करण्यात आला आहे. मात्र जलतरण तलाव कुलूप बंद अवस्थेत आहे. मग हा खर्च नेमका कशासाठी आणि कुणासाठी केला जात आहे, असा सवाल आंदोलना दरम्यान तापकीर यांनी उपस्थित केला.
















