न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ डिसेंबर २०२२) :- जमीनीच्या ले-आऊटला सक्षम प्राधिकरणाची परवानगी तसेच गृहप्रकल्पांना पूर्णत्वाचा दाखला, रेरा क्रमांक असेल तरच दस्त नोंदणी करता येणार असल्याची माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
राज्यातील तुकडेबंदी व ग्रामपंचायत हद्दीतील सदनिकांची तसेच पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या गावांतील गृहप्रकल्पांची दस्त नोंदणी बंद केल्याबाबत विधानसभेमध्ये सात आमदारांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना विखे पाटील यांनी ही माहिती दिली.
महाराष्ट्र नोंदणी नियम १९६१ चे नियम ४४ (१) ई नुसार प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची दस्त नोंदणी करताना सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी दस्तासोबत जोडली असल्यास दस्त नोंदणी करता येते. पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या गावाच्या गृहप्रकल्पांची दस्त नोंदणी करताना दस्तासोबत योग्य प्राधिकरणाकडील पूर्णत्वाचा दाखला किंवा रेरा प्रमाणपत्र जोडल्यास नोंदणीसाठी कोणतेही बंधन नसल्याचे विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
गुंठेवारीच्या बांधकामांमधील सदनिकांची दस्त नोंदणी करताना योग्य नियमितीकरण दाखला जोडल्यास दस्त नोंदणी करण्यात येत असल्याचे पाटील यांनी पुणे महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) महसूल हद्दीत गावठाण हद्दीच्या बाहेरील अनधिकृत बांधकामांवर तसेच ले आऊट मंजूर न करता केलेल्या दस्त बेकायदा प्लॉटिंगवर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली.
















