- विशेष भरारी पथकांची नियुक्ती; रात्र गस्तीसह ठिकठिकाणी तपासणी नाके…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ डिसेंबर २०२२) :- नववर्षाच्या स्वागतासाठी फार्म हाउस, रिसॉर्ट, तसेच इतर काही ठिकाणी अवैध पार्टी केली जाते. अशा पद्धतीने धिंगाणा करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभागाकडून कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी विशेष भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. नववर्ष स्वागतासाठी मोठा जल्लोष केला जातो. काहीजण मद्यपान करतात. त्यासाठी नियमांचे उल्लंघन केले जाते. त्यानुषंगाने खबरदारी म्हणून एक्साइजच्या पथकांचा वॉच राहणार आहे.
नववर्षाच्या स्वागतानिमित्त पुणे जिल्ह्यामध्ये पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येतात. त्यातील अनेकांकडून फार्म हाउस, रिसॉर्टवर अवैध पार्टीचे आयोजन होते. त्यासोबतच अवैधरीत्या मद्यसाठा, पुरवठा, विक्री व वाहतूक केली जाते. यावर एक्साइजाने लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी पुणे विभागात एक्साइजकडून १४ नियमित पथके व इतर १० विशेष पथके तयार केली आहेत, तसेच रात्र गस्तीसह ठिकठिकाणी तपासणी नाके उभारणार आहेत. परराज्यातून येणाऱ्या मद्यसाठ्यावर, तसेच बनावट मद्यावरही लक्ष ठेवण्यात येणार आहे. अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक व विक्री याबाबत माहिती मिळाल्यास. संबंधित नागरिकांनी ०२०-२६०५८६३३, तसेच १८००२३३९९९ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन एक्साइजकडून करण्यात आले आहे.
एक्साइजच्या पुणे विभागात १ एप्रिल ते २१ डिसेंबर २०२२ या कालावधीत अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक आणि विक्रीवर वेळोवेळी नियमित व विशेष पथकांद्वारे कारवाई केली आहे. त्यासोबतच नववर्षाच्या स्वागतानिमित्त अवैध पार्टी करणे, मद्याची अवैध वाहतूक, विक्री, साठा, पुरवठा यावरही कारवाई होणार आहे.
– चरणजितसिंग राजपूत, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, पुणे…
















