- महापालिकेची प्रिंटला बगल; डिजिटलकडे वाटचाल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ डिसेंबर २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. विशेष म्हणजे यंदा कागदपत्रांऐवजी सॉफ्टवेअरच्या मदतीने ई- बजेट तयार करण्यात येणार आहे. महापालिकेने डिजिटलकडे टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल असून यामुळे मनुष्यबळासह खर्चाचीही बचत होणार आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये महापालिका सुमारे सहा हजार कोटी रुपयांचे ई- बजेट सादर करणार आहे.
लेखा विभागाच्या वतीने अंदाजपत्रक तयार करण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. त्यासाठी आयुक्त शेखर सिंह यांनी विविध ५२ सूचना केल्या आहेत. दरवर्षी कागदांवर माहिती दिली जात असे. विभागामध्ये करायची कामे, त्यासाठी लागणारा खर्च, कामाबाबत माहिती कागदांवर द्यावी लागत असे. त्यासाठी मोठे मनुष्यबळ कामाला लावावे लागतअसे. मात्र, आता ही माहिती सॉफ्टवेअरच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. प्रत्येक विभागाने सॉफ्टवेअरमध्ये भरलेली माहिती लेखा विभागाकडे जमा होईल. लेखा विभागाने ई- बजेट करण्यासाठी नॅशनल म्युनिसिपल अकाउंटिंग मॅन्युअल या संगणक प्रणालीतून सन २०२२-२३ चे सुधारित व सन २०२३-२४ च्या मूळ तरतुदी महसुली किंवा भांडवली लेखाशीर्षावर भरण्यास सांगण्यात आले आहे.
गतवर्षी महापालिकेचे एकूण ४९६१ कोटी ६५ लाख व केंद्र शासन व राज्य शासनाच्या पुरस्कृत योजनेसह ६ हजार ४९७ कोटी २ लाख रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते. हे अंदाजपत्रक सन २०२१-२२ च्या तुलनेत ६२७ कोटींनी घटले होते. त्यावर कोरोना महामारीचा परिणाम झाल्याचा दावा केला जात होता.
दरवर्षी अंदाजपत्रक छापण्यासाठी सात लाख रुपये खर्च येतो. मात्र, यंदा अंदाजपत्रक छापण्यात येणार नाही. अंदाजपत्रक प्रसिद्ध केल्यानंतर सॉफ्टवेअरवरच ते दिसणार आहे. त्याची पीडीएफ फाइल संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे. तर अंदाजपत्रक प्रसिद्धीसाठी दोन प्रती छापण्यात येणार आहेत. यंदा उत्पन्नात वाढ झाली असली तरी शहरातील जुने प्रकल्प पूर्ण करण्याचे आव्हान असणार आहे. त्यामुळे यंदाही शहराला अंदाजपत्रकातून मोठे प्रकल्प मिळणार की नाही याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
महापालिकेच्या वतीने ई-बजेट तयार करण्यात येत आहे. प्रत्येक विभागाकडून त्यासाठी सॉफ्टवेअरच्या माध्यमातून महापालिकेतील ५२ विभागांकडून माहिती घेण्यात येत आहे. ई- बजेट केल्यामुळे महापालिकेचा खर्च वाचणार आहे. तसेच मनुष्यबळदेखील कमी लागणार आहे.
– जितेंद्र कोळंबे, लेखाधिकारी, पि. चि. महापालिका…


















