न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ डिसेंबर २०२२) :- गेल्या दोन दिवसांपासून आकुर्डी गावचे ग्रामदैवत श्री खंडोबा (यात्रा) गावजत्रा सुरू आहे. यात्रेला १ लाखाहून अधिक भाविक दर्शनासाठी मुख्य मंदिरात पोहचत असतात. गावापासून हे मंदिर मुंबई-पुणे महामार्गाच्या पलीकडे असल्यामुळे भाविकांना वाहनांच्या अडथळयास पार करून जावे लागते. वाहतूक कोंडीचा सामनाही करावा लागतो. यात्रेच्या कालावधीत सलग दोन दिवस वाहतूक नियमित व सुरळीत करण्यासाठी निगडी वाहतूक विभागास प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे पोलीस मित्र रात्री उशिरापर्यंत सहकार्य करीत आहेत.
मुंबई-पुणे महामार्गाच्या मुख्य चौकात, बस स्टॉप व मंदिर प्रवेशद्वार येथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम पोलिस मित्रांनी केले. वाहतूक पोलीस मित्र निगडी विभागाचे प्रमुख विशाल शेवाळे, लक्ष्मण इंगवले, भरत उपाध्ये, उद्धव कुंभार, सतीश बाबर, तेजस सापरिया यांनी पोलीस निरीक्षक सौ विजया कारंडे व प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले.
निगडी वाहतूक विभागाच्या प्रमुख पोलिस निरीक्षक विजया कारंडे म्हणाल्या, ” यंदाच्या वर्षी यात्रेत भाविकांच्या गर्दीत वाढीची शक्यता गृहीत धरून आकुर्डी व निगडी परिसरात वाहतूक पोलिस व १५ पोलीस मित्रांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी विभाग सतर्क आहे. पोलीस मित्रही रात्री उशिरापर्यंत पोलिसांना सहकार्य करत आहेत.
निगडी विभागाचे प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विशाल शेवाळे म्हणाले, “कोरोना काळानंतर प्रथमच शासनाचे नियम शिथिल झाल्या कारणाने यंदाच्या वर्षी भाविकांच्या संख्येने लाखाचा टप्पा पार केला आहे. यात्रेत गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व वाहतुकीचे नियमन करण्यासाठी पोलिस विभागाला मदत हेतू सुरक्षा समितीचे स्वयंसेवक रात्रीही कार्यरत आहेत.”


















